कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी ३०० कोटी ?

कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी ३०० कोटी ?

बंगळूर - काँग्रेस-धजद युती सरकार पाडून भाजपची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खाण सम्राट रेड्डी बंधूंनी ३०० कोटींचे ‘भांडवल’ देऊ केले असल्याचे समजते. काँग्रेस व धजदमधील २० आमदार भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२००८ मध्ये भाजपने ११० जागा मिळवूनही राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. यावेळी अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी व विरोधी पक्षांच्या आमदारांना ऑपरेशन कमळच्या जाळ्यात अडकविण्यासाठी रेड्डी बंधूंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आताही आपल्या निकटच्या व्यक्तीस उपमुख्यमंत्रीपद दिल्यास यावेळीही ऑपरेशन कमळ घडवून आणण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.

काँग्रेस व धजदच्या १५ ते २० आमदारांना राजीनामा देण्यासाठी प्रत्येकी मोठे म्हणजे १५ ते २० कोटींचे ‘भांडवल’ देण्याची तयारी दर्शविली आहे. शिवाय त्यांच्या पोटनिवडणुकीचा खर्चही उचलण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. राजीनामा दिल्यानंतरच्या पोटनिवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच येण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे निवडणूक जिंकणे सुलभ होईल, असा त्यांचा अंदाज आहे. यासंदर्भात रेड्डी बंधूंनी उत्तर कर्नाटकातील काही आमदारांशी संपर्क साधला असून त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे समजते.

भाजपचे १० आमदार संपर्कात?
युती सरकार पाडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला शह देण्याचा काँग्रेसनेही प्रयत्न चालविला आहे. भाजपमधील काही असंतुष्ट मतदारांना गाठून त्यांची पक्षश्रेष्ठींशी गाठभेट घडवून आणण्यात येत असल्याचे समजते. धजदचे नेते व मंत्री सा. रा. महेश यांनी भाजपमधील १० आमदार युती सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

गणेशोत्सवानंतर चांगली बातमी
काँग्रेसमधील गोंधळाच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्येही हालचालींना वेग आला आहे. साखळी बैठका घेऊन काँग्रेस-धजद आमदारांना ऑपरेशनच्या जाळ्यात अडकविण्यासाठी योजना आखण्यात येत असल्याचे समजते. दोन, तीन दिवस थांबा, गणेशोत्सवानंतर तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्षाच्या आमदारांकडे व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com