उत्तर प्रदेशमध्ये विषारी वायूमुळे 300 विद्यार्थ्यांना त्रास

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

या घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी श्‍यामलीच्या आयुक्तांना दिला असून बाधित मुलांना सर्व प्रकारची मदत पुरविण्याची सूचना जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना केली आहे

लखनौ - उत्तर प्रदेशमधील श्‍यामली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे 300 शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारणपूरच्या आयुक्तांना दिला आहे.

श्‍यामली येथील एका खासगी शाळेजवळ असलेल्या साखर कारखान्यातून विषारी वायू बाहेर सोडण्यात येतो. यामुळे शाळेतील 300 मुलांना याची बाधा होऊन पोटात आग पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, मळमळ असा त्रास त्यांना जाणवू लागला. या मुलांवर विविध रुग्णालयांवर उपचार सुरू असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे मेरठ विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.

माहिती व प्रसारण विभागाचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी म्हणाले, "" या घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी श्‍यामलीच्या आयुक्तांना दिला असून बाधित मुलांना सर्व प्रकारची मदत पुरविण्याची सूचना जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, या कारखान्यातील कामगार कचऱ्यातच विषारी रसायन फेकत असल्याने यातून विषारी वायू बाहेर पडत असतो, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. हा घातक वायू तो श्‍वसनाद्वारे शरीरात गेल्याने मुलांना त्रास होऊ लागला. यातील काही जण बेशुद्ध पडली, असे त्यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :