मासिक पाळी तपासण्यासाठी 70 मुलींना केले नग्न; शाळेच्या वॉर्डनचे कृत्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

एका निवासी शाळेच्या बाथरूममध्ये रक्त आढळल्याने एका निवासी शाळेच्या महिला वॉर्डनने कोणत्या मुलीची मासिक पाळी आली आहे, हे तपासण्यासाठी शाळेतील 70 मुलींना नग्न केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - एका निवासी शाळेच्या बाथरूममध्ये रक्त आढळल्याने शाळेच्या महिला वॉर्डनने कोणत्या मुलीची मासिक पाळी आली आहे, हे तपासण्यासाठी शाळेतील 70 मुलींना नग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

येथील कस्तुरबा गांधी निवासी शाळेत हा प्रकार घडला. याबाबत माहिती देताना शाळेतील एका विद्यार्थीनीने सांगितले की, "शाळेत कोणीही शिक्षक नव्हते. त्यावेळी आम्हाला खाली बोलाविण्यात आले. (वसतीगृहातून) मॅडमनी आम्हाला कपडे काढण्यास सांगितले. कपडे काढले नाही तर शिक्षा केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आम्हा लहान आहोत. जर आम्ही त्यांचे ऐकले नसते, तर त्यांनी आम्हाला शिक्षा केली असती.' "तिने विद्यार्थीनींना जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. आम्हाला काय करावे तेच समजले नाही. ज्यावेळी मी ही घटना वृत्तपत्रात वाचली, तेव्हा मी माझ्या मुलीला याबाबत विचारले. त्यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगितला', अशा शब्दात एका त्रस्त पालकाने घडलेला प्रकार सांगितला.

हे सर्व आरोप फेटाळत वॉर्डनने असे काही घडले नसल्याचे सांगितले आहे. "कोणीही त्यांना कपडे काढण्यास सांगितले नाही. येथील शिक्षकांना मी येथे राहावी असे वाटत नाही, त्यामुळेच त्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला आहे. मी कडक असल्याने ते माझा द्वेष करतात', अशा शब्दांत वॉर्डनने आरोप फेटाळून लावले आहेत.

एका पालकाने केलेल्या तक्रारीनुसार वॉर्डनने केवळ अपमान केला नाही, तर शिक्षा करण्याची धमकी दिली, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी चंद्रकेश यादव यांनी दिली. या प्रकरणी राज्यसरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. "आम्ही कडक कारवाई केली आहे. पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ते या प्रकरणाचा तपास करत असून वॉर्डनला लवकरच काढून टाकण्यात येईल. अशा प्रकारे कदापि सहन केले जाणार नाहीत', असेही यादव यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 70 Girls Allegedly Stripped In UP School, For Menstrual Blood Check