पाकच्या गोळीबारात आठ नागरिक जखमी 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पाकिस्तानी लष्कराने आज सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भिम्भेर गली सेक्‍टरमध्ये छोट्या तसेच स्वयंचलित शस्त्रांमधून गोळीबार केला, तसेच तोफगोळ्यांचाही मारा केला.

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करत जम्मू-काश्‍मीरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवरील भारतीय लष्कराच्या चौक्‍या आणि नागरी भागात बुधवारी गोळीबार केला. यामध्ये एका दोन वर्षे वयाच्या मुलीसह आठ नागरिक जखमी झाले. 

पाकिस्तानी लष्कराने आज सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भिम्भेर गली सेक्‍टरमध्ये छोट्या तसेच स्वयंचलित शस्त्रांमधून गोळीबार केला, तसेच तोफगोळ्यांचाही मारा केला. भारतीय जवानांनी पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती संरक्षण विभागातील प्रवक्‍त्याने दिली. 

पूँच जिल्ह्यातील गोळीबारात 3 कामगारांसह पाच जण जखमी झाले, तर राजौरी जिल्ह्यातील मनाजकोटे भागात एका दोन वर्षे वयाच्या मुलीसह तीन नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात तीन वाहने आणि इलेक्‍ट्रिकल उपकरणांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात पाकच्या गोळीबारात दोन मुले आणि दोन तरुण जखमी झाले होते. 2017 या वर्षात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.