गुरुग्राममध्ये दुसरीतील विद्यार्थ्याचा बस चालकाकडून खून

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल या शाळेमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी शाळेची दैनंदिन तपासणी सुरू असताना सात वर्षांच्या या मुलाचा मृतदेह स्वच्छतागृहामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

गुरुग्राम : येथील एका शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून स्कूलबस चालकाला अटक केली आहे. 

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल या शाळेमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी शाळेची दैनंदिन तपासणी सुरू असताना सात वर्षांच्या या मुलाचा मृतदेह स्वच्छतागृहामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मुलाला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या मुलावर लैंगिक अत्याचार झाले असण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेचे वृत्त पसरताच संतप्त पालक आणि नागरिकांनी शाळेवर मोर्चा नेला. मुलाच्या पालकांनी शाळेवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. 

पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू करत स्कूलबसचा चालक अशोककुमार याला अटक केली आहे. तसेच, चौकशीसाठी बस कंडक्‍टर, शाळेचे काही कर्मचारी अशा दहा जणांना ताब्यात घेतले आहे. अशोककुमारने खून केल्याचे कबुल केले आहे.