लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच दुसरीतील विद्यार्थ्याचा बस चालकाकडून खून

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने आपण प्रद्मुम्न ठाकूरचा खून केल्याची कबुली स्कूल बस कंडक्‍टर अशोक कुमारने दिली आहे. अत्याचाराला विरोध केल्याने आपण त्याचा गळ्यावर वार केला, असे अशोकने सांगितले

गुरुग्राम - रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी (ता. 8) दुसरीत शिकणाऱ्या प्रद्मुम्न ठाकूर या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. त्या प्रकरणात शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे. लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने आपण प्रद्मुम्नचा खून केल्याची कबुली स्कूल बस कंडक्‍टर अशोक कुमारने दिली आहे.

अशोकला गुरुग्राम न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची सत्यशोधन समितीची स्थापना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली. तसेच या घटनेचा अहवाल व "एफआयआर'ची प्रत दोन दिवसांत सादर करण्याचा आदेश शाळेला दिला असल्याचे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे सांगितले. शाळेची काल तपासणी सुरू असताना सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह स्वच्छतागृहामध्ये आढळून आला होता. या भीषण घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली असून याची "सीबीआय' चौकशी व्हावी, अशी मागणी करीत संतप्त पालक आणि स्थानिक नागरिकांनी आज शाळेच्या परिसरात दोन तास आंदोलन केले. 

गुरुग्राम पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करण्यात आली. मुलाच्या खूनप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली. पोलिसांनी शाळेच्या अन्य दोन कर्मचाऱ्यांसह अशोकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या वेळी अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केली. अशोकला आज दुपारी गुरुग्राम न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

"रायन इंटरनॅशनल शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापिका नीरजा बात्रा यांना निलंबित करण्यात आले असून सर्व सुरक्षा रक्षकांना कामावरून काढले आहे,'' असे जिल्हा जनसंपर्क अधिकारी आर. एस. सागवान यांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या हत्येसंबंधी रविवारपर्यंत (ता. 10) अहवाल देण्याचा आदेश गुरुग्रामचे उपायुक्त विनयप्रताप सिंह यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी नीलम भंडारी यांना दिला आहे.

दरम्यान, आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय येथील बार असोसिएशनच्या सदस्यांनी घेतला आहे. राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण समितीने याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना पोलिसांकडून शहानिशा करण्यात कुचराई केल्याबद्दल शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीने पोलिसांकडे केली आहे. शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सुरक्षा संस्थेविरुद्ध फिर्याद दाखल करणार असल्याचे निलंबित मुख्याध्यापकांनी सांगितले. यापूर्वी 2016 मध्ये रायन शाळेच्या नवी दिल्लीतील वसंत कुंज येथील शाखेत सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला होता.

लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने आपण प्रद्मुम्न ठाकूरचा खून केल्याची कबुली स्कूल बस कंडक्‍टर अशोक कुमारने दिली आहे. अत्याचाराला विरोध केल्याने आपण त्याचा गळ्यावर वार केला, असे अशोकने सांगितले. शाळेच्या अन्य दोन कर्मचाऱ्यांसह अशोकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या वेळी अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अशोकला आज दुपारी गुरुग्राम न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

शाळा बंद
शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी संबंधित यंत्रणा सरकारला देत नाही तोपर्यंत शाळां बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. "सीबीएसई'ने या घटनेचा अहवाल सादर करण्यास शाळेला दोन दिवसांची मुदत दिली आहे.

विद्यार्थ्याच्या हत्येची ही घटना दुर्दैवी आहे. निष्पाप मुलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. या घटनेतून अन्य शाळांनी धडा घ्यावा.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

हरियाणा सरकारचे या घटनेवर लक्ष आहे. जर यात शाळा व्यवस्थापन दोषी आढळले तर दोषींना शिक्षा करण्यासाठी शाळेची मान्यता रद्द करण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही.
- रामविलास शर्मा, शिक्षणमंत्री, हरियाणा
 

Web Title: 8 year old gurgaon school student killed bus conductor after sexual assault attempt