रेल्वे तिकिटांसाठी लवकरच आधार कार्ड अनिवार्य

पीटीआय
गुरुवार, 2 मार्च 2017

तिकिटविक्री यंत्रणा ही पूर्णत: "रोखरहित' (कॅशलेस) करण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या योजनांमागे आखण्यात आले आहे. याच उद्देशार्थ येत्या मे महिन्यापासून रेल्वेकडून "तिकिट ऍप'ही लॉंच करण्यात येणार आहे

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी केल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांमधील गैरप्रकार रोखण्याकरिता ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी आता लवकरच आधार कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे दलालांकडून होणारी एकगट्ठा तिकिट खरेदी, खोट्या नावाने केली जाणारी आरक्षणे यांसारखे गैरप्रकार रोखण्यात यश येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर, येत्या 1 एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकिटे मिळविण्यासाठी आधार कार्ड क्रमांक पुरविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या नव्या योजनेची चाचणी सध्या सुरु आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी आज (गुरुवार) घोषित केलेल्या नव्या योजनेनुसार, "आधारआधारित' तिकिट व्यवस्थेबरोबरच देशभरात 6 हजार "पॉईंट ऑफ सेल' मशिन्स व तिकिटे पुरविणारी 1 हजार स्वयंचलित यंत्रे रेल्वेकडून बसविण्यात येणार आहेत. तिकिटविक्री यंत्रणा ही पूर्णत: "रोखरहित' (कॅशलेस) करण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या योजनांमागे आखण्यात आले आहे. याच उद्देशार्थ येत्या मे महिन्यापासून रेल्वेकडून "तिकिट ऍप'ही लॉंच करण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर आधार क्रमांकाची नोंदणी करण्यामधून खोट्या नावांचा आधार घेऊन तिकिट खरेदी करण्याच्या प्रकारास नक्कीच आळा बसेल, असे मत रेल्वे मंत्रालयामधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.