'आधार'ची माहिती चोरण्याचा प्रयत्न नाही

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

 भारतीय नागरिकांक प्राधिकरणाची माहिती
 

नवी दिल्ली : आधारचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित असून, आतापर्यंत तो हॅक करण्यासाठी कोणताही सायबर हल्ला झालेला नाही, अशी माहिती भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा कारणास्तव नेमक्‍या सायबर सुरक्षा उपायोजनांची माहिती देण्यास मात्र, प्राधिकरणाने नकार दिला आहे. आधारच्या बायोमेट्रिक डेटाची चोरी करण्यासाठी किती सायबर हल्ले झाले, याबद्दल माहिती अधिकारांतर्गत विचारणा करण्यात आली होती. आतापर्यंत असे हल्ले झाले नाहीत, असे उत्तर प्राधिकरणाने दिले आहे.

प्राधिकरणाकडे 114 कोटी भारतीयांची माहिती असून, बंगळूर आणि मानेसर सहा हजार सर्व्हरच्या मदतीने तिचे व्यवस्थापन केले जात आहे. देशातील 13.5 कोटी नागरिकांच्या आधारची माहिती सरकारी संकेतस्थळावरून उघड झाल्याचा दावा "सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटी'ने नुकताच केला होता. या पार्श्‍वभूमीवर ही विचारणा करण्यात आली होती.