केजरीवाल, आप आता मोदींवर टीका करणार नाही!

पीटीआय
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोदी यांच्यावर टीका करण्याचे धोरण महागात पडू शकते

नवी दिल्ली - पंजाब व गोवा राज्यामधील अतिसुमार कामगिरीमुळे धास्तावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण बदलले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपने हा महत्त्वपूर्ण बदल केला असून पक्षाकडून आता "सकारात्मक प्रचारा'वर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

"2015 मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने तयार केलेल्या धोरणाचीच आता पुन्हा एकदा अंमलबजावणी केली जाणार आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोदी यांच्यावर टीका करण्याचे धोरण महागात पडू शकते,'' अशी प्रतिक्रिया आपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्‍त केली आहे.

आपच्या या निर्णयास भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांत नुकत्याच मिळविलेल्या नेत्रदीपक विजयांचीही पार्श्‍वभूमी आहे. दिल्लीमध्ये मूळच्या या दोन राज्यांमधील असलेल्या मतदारांची मोठी संख्या आहे.

पंजाब व गोवा या दोन राज्यांत नुकत्याच झालेल्या निवडणुकांत आपला सपाटून मार खावा लागला होता. 117 जागा असलेल्या पंजाबमध्ये आपला अवघ्या 20 जागा मिळाल्या; तर गोव्यामध्ये तर पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर, आपने आता धोरण बदलायचे ठरविले आहे.

Web Title: AAP changes strategy for Delhi civic polls