केजरीवाल यांनी चौकशीला सामोरे जावे: हजारे

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

केजरीवाल या प्रकरणात दोषी आढळले नाहीत तर त्यांनी त्याव्यतिविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा. दोषी आढळल्यास काही सेकंदात त्यांनी राजीनामा द्यावा.

बंगळूर - आप नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांनी चौकशीला सामोरे जावे असे वक्तव्य केले आहे.

कपिल मिश्रा यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मिश्रा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच उपोषणाला सुरवात केली आहे. केजरीवाल यांनी अद्याप यावर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.

अण्णा हजारे म्हणाले, की मिश्रा यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी केजरीवाल यांनी चौकशीसाठी तयार रहावे. त्यांनी चौकशीसाठी पुढे आले पाहिजे. केजरीवाल या प्रकरणात दोषी आढळले नाहीत तर त्यांनी त्याव्यतिविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा. दोषी आढळल्यास काही सेकंदात त्यांनी राजीनामा द्यावा. केजरीवाल यांच्यावर असे आरोप झाल्याने मी खूप दुःखी आहे. भ्रष्टाचाराच्या लढाईत ते कायम माझ्यासोबत होते. आता त्यांच्याच पक्षातील नेत्याने त्यांच्यावर दोन कोटी घेतल्याचा आरोप केला आहे.