'आप'ची मते अकालीला तर नाही गेली? - केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

निवडणूक आयोगाने आपल्या जबाबदारीपासून पळू नये. त्यांनी बॅलेट पेपरचा वापर करून ईव्हीएममधील मतदानाशी तुलना करावी, यामुळे नागरिकांचा आणखी विश्वास वाढेल. ईव्हीएमच्या जागी अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल.

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) 25 टक्के मते मिळाली आहेत. तर, अकाली दलाला 31 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे शंका आहे, की आपची मते अकाली दलाला तर नाही गेली, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. तर, आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. सत्ताधारी अकाली दल व भाजप युतीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत आपला 25 टक्के मते पडल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाली दलाला 31 टक्के मते पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयी आणि ईव्हीएम मशीनविषयी शंका उपस्थित केल्या.

केजरीवाल म्हणाले, ''भाजप-अकाली दल युतीला 31 टक्के मते कशी मिळाली. आपला फक्त 25 टक्केच मते कशी काय? सर्वजण म्हणत होते, आप चांगली कामगिरी करत आहे. मग, मतांची टक्केवारीत फरक कसा? पंजाबमध्ये सर्वांना आप जिंकण्याची खात्री होती. पंजाबमधील नागरिकांची अकाली दलाबद्दल नाराजी असताना त्यांना 31 टक्के मते कशी मिळाली. ईव्हीएममध्ये फेरफार करता येऊ शकतो आणि असुरक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मग, सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोण मोठे आहे. मला माहिती आहे, या वक्तव्यानंतर तुम्ही माझी चेष्टा कराल. निवडणूक आयोगाने आपल्या जबाबदारीपासून पळू नये. त्यांनी बॅलेट पेपरचा वापर करून ईव्हीएममधील मतदानाशी तुलना करावी, यामुळे नागरिकांचा आणखी विश्वास वाढेल. ईव्हीएमच्या जागी अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल. नागरिकांचा ईव्हीएमवरील विश्वास उडाला आहे. ईव्हीएममधून मते फिरविण्यात तर आली नाहीत. एका अपक्ष उमेदवाराला एकही मत मिळालेले नाही. त्या उमेदवाराने स्वतःलाच मत कसे दिले नसेल.''

Web Title: AAP got 25% votes & SAD got 31%, how is it possible?: Arvind Kejriwal