राज्यपालच दिल्लीचे प्रमुख! 'आप'ला पुन्हा धक्का

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली : ‘राजधानी नवी दिल्लीच्या प्रशासकीय प्रमुखपदी नायब राज्यपालच आहेत‘ या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची ‘आम आदमी पार्टी‘ची (आप) विनंती सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) फेटाळली. उच्च न्यायालयाच्या आदेशावर अपील करण्यासाठी दिल्ली सरकारने सहा वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर भूमिका मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

‘नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत; मुख्यमंत्री नाहीत‘ असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट रोजी दिला होता. केंद्र सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याबरोबर दिल्लीतील ‘आप‘ सरकारचा सतत संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाचा हा निर्णय सत्ताधारी ‘आप‘साठी मोठा धक्का होता. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. 

न्यायाधीश ए. के. सिक्री आणि एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारची याचिका दाखल करून घेतली; मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिरी देण्यास नकार दिला. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नियुक्‍त्या आणि इतर निर्णयांची वैधता तपासण्यासाठी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या कामकाजासही स्थगिती द्यावी, ही मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 

‘दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सहा वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत‘ आणि ‘दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, ही मागणी मागे घेत आहोत‘ अशी माहिती ‘आप‘ सरकारने 2 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयास दिली होती.

Web Title: Aap in trouble