चंदेरी दुनियेतील कलावंत सामान्यांसाठी देवाचे रूप!

चंदेरी दुनियेतील कलावंत सामान्यांसाठी देवाचे रूप!
चंदेरी दुनियेतील कलावंत सामान्यांसाठी देवाचे रूप!

कलांचा आविष्कार सादर करीत लोकांची मने जिंकण्याचे काम सर्वांनाच जमत नाही. म्हणून तर कलाकार लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. एखादी कला फक्त कलाकारापुरती मर्यादित राहत नाही. ती साऱ्या विश्‍वाची बनून जाते. अजरामर कलाकृती लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. अशी कलाकृती निर्माण करणारा कलाकार लोकांच्या गळ्यातील ताईत बनून जातो. सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या चित्रपटातील कलावंत तर अधिक लोकप्रिय ठरतात. लोकांमध्ये स्थान मिळाल्यावर नकळत त्यांच्यातील सत्तेच्या राजकारणाची महत्त्वाकांक्षा जागी होते. चित्रसृष्टीचा प्रवास राजकारणाकडे वळतो. सर्वच कलाकार राजकारणात यशस्वी होतातच असे नाही. मात्र, काही कलावंत चित्रसृष्टीप्रमाणेच राजकारणातही आपला प्रभाव निर्माण करू शकतात. तमीळनाडूतील रसिकांची "अम्मा' जयललिता ही अशीच एक मनस्वी कलावंत. जिने चित्रपटसृष्टीत यश मिळविलेच. पण राजकारणात जाऊन देशभरात आपली वेगळी प्रतिमा जोपासली.

भारतात चित्रपटासृष्टीतील अभिनेता किंवा अभिनेत्री लोकमानसात खूपच प्रभावी ठरतात. या लोकप्रियतेमुळे अनेकांनी राजकारणाची कास धरली. त्यात दाक्षिणात्य राज्यातील अभिनेते किंवा अभिनेत्री राजकारणातही यशस्वी ठरल्या. त्यापैकी तमीळमधील करूणानिधी, एम. जी रामचंद्रन, जयललिता आणि तेलगूमधील एन. टी. रामाराव या चार दिग्गजांनी तर मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळली. त्या तुलनेत उत्तरेतील कलावंतानी केलेले प्रयत्न तितके यशस्वी झाल्याचे दिसत नाही. तरीही अनेक कलावंतांनी राजकारणाचा मार्ग तपासून पाहिला. सुनील दत्त, वैजयंतीमाला, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, हेमामालिनी, राज बब्बर, जयाप्रदा, जया बच्चन, विनोद खन्ना, गोविंदा, स्मृती इराणी असे कलाकार संसदेपर्यंत पोहचले. शहेनशहा अमिताभ बच्चनही यापासून अलिप्त राहिलेले नाहीत. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघातून त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. पण ते राजकारणात रमू शकले नाहीत. यापैकी सुनील दत्त यांची राजकीय कारकीर्द वेगळी ठरली. चॉकलेट हिरो देव आनंद यांनीही आणीबाणीच्या काळात "नॅशनल पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली. मात्र, तो पक्ष अल्पजीवी ठरला. दक्षिणेकडील राजकारण भावनांवर चालणारे आहे. त्यामुळेच कदाचित दाक्षिणात्य कलावंतांना राजकारणातही अधिक लोकप्रियता लाभली असावी.

दक्षिणेत ही परंपरा निर्माण झाली. एम. जी. रामचंद्रन साठच्या दशकात कॉंग्रेस कार्यकर्ते होते. करूणानिधींशी मतभेद झाल्याने त्यांनी अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी काम करण्याचे कसब त्यांनी सिद्ध केले. त्यांचे एक पाऊल चंदेरी दुनियेत असायचे. मुख्यमंत्रिपद सांभाळतानाच ते चित्रीकरणही करीत असत. राजकारण आणि चित्रीकरण दोन्हीत त्यांनी अखेरपर्यंत व्यस्तता सांभाळली. "मदुरायई मीटा सुंदरपंदीयन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट की ज्यात राज्याचा मुख्यमंत्रीच चित्रपटाचा हिरो होता. त्यामुळे हा चित्रपट खूपच गाजला. जयललिता या एम. जी. रामचंद्रन यांच्या उत्तराधिकारी. मात्र, राजकारणात प्रवेश केल्यावर जयललितांनी चित्रपटातील काम बंद केले होते. करूणानिधीही नाटकांत काम करीत असतं. मात्र संवादलेखक, म्हणून ते परिचित होते. परशक्ती आणि मनोहारी या चित्रपटांच्या पटकथा व संवादलेखनामुळे त्यांचा लौकिक झाला. मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी अर्ध्या डझनाहून अधिक कथा लिहिल्या. ते डॉ. कलैग्नार म्हणून ओळखले जायचे. कलैग्नार म्हणजे साहित्यिक लेखक. जयलिलता या कलावंत म्हणून मोठ्या होत्याच. पण राजकारणातही त्या काकणभर सरसच ठरल्या. पण त्यांच्या व्यक्तीगत आणि सार्वजनिक आयुष्यातही त्यांना सतत संघर्ष करावा लागला. त्यांचे व्यक्तीमत्व तसे वादग्रस्तच राहिले. यश-अपयशाचे रंग त्यांना अनुभवास मिळाले. अनेक चढ उतार पाहत त्यांनी अफाट लोकप्रियता कमाविली. म्हैसूरच्या तमीळी ब्राह्मण कुटुंबात 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला. वय दोन वर्षांचे असतानाच वडलांचे निधन झाले. हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाची वाटचाल सुरू झाली. वयाच्या तेराव्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. 1964 मध्ये "चन्नदा गोमळे' (सोनेरी स्त्री) या कन्नड भाषिक सिनेमातून तिची कारकीर्द सुरू झाली तरी त्यांना यश दिले ते तमीळ चित्रपटांनी. "वेनिरा अदाई' हा त्यांचा पहिला तमीळ चित्रपट 1965 मध्ये प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्यांनी एम. जी. रामचंद्रन यांच्याबरोबर एका सिनेमात काम केले. त्यानंतर एमजीआर- जयलिलता ही जोडी सुपरडुपर हिट ठरली. त्या दोघांनी एकत्रित केलेल्या 28 चित्रपटांपैकी अनेक चित्रपट हिट झाले. जयललिता यांनी सुमारे तीनशे चित्रपटात काम केले. "इज्जत' हा धर्मेंद्रबरोबर काम केलेला त्यांचा एकमेव हिंदी चित्रपट.

चित्रपटसृष्टीतील सहकारी कलाकारच जयललितांचा राजकीय गुरू. एमजीआर 1977 मध्ये मुख्यमंत्री झाले. एआयडीएमके पक्षाच्या त्या 1982 मध्ये सदस्या झाल्या. त्यानंतर पक्षाच्या प्रचारप्रमुख, राज्यसभा सदस्य त्या झाल्या. एमजीआर यांचे 1987 मध्ये निधन झाले. त्यानंतर पक्षात दोन गट पडले. त्यात एक जानकी रामचंद्रन यांचा तर दुसरा जयललिता यांचा. पुढे जयललिताच प्रभावी ठरल्या. पक्षाची सुत्रे त्यांच्याकडे आली. 1991 मध्ये जयललितांकडे सत्ता आली. करूणानिधींनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. 1996मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे 2001 मध्ये पुन्हा त्या मुख्यमंत्री झाल्या. 2006 मध्ये पुन्हा हारल्या. 2011 ला पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. सत्तेच्या राजकारणातील चढउतार त्यांनी अनुभवले. 2016 मध्ये त्यांनी विक्रमी यश मिळविले. आता त्या सत्तेत होत्या. त्यांच्या निधनानंतर चैन्नईमध्ये झालेली अलोट गर्दी आणि चाहत्यांचे दुःख पाहिले की या मनस्वी कलाकाराने लोकांची मनात मिळविलेले स्थान लक्षात येते.

सिनेमासारख्या माध्यमातून लोकांचे फक्त मनोरंजन होत नाही. लोकांच्या मनात असंख्य स्वप्ने पेरली जातात. चंदेरी दुनियेतील स्वप्नांपेक्षा वास्तव कितीही वेगळे असले तरी "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' यानुसार कलावंत लोकांच्या हृदयात अजरामर होतो. लोकांवरील अन्याय दूर करणारा, गरीबांसाठी आपले आयुष्य पणाला लावणारा हिरो सिनेमात पाहतो. लोकांचा कळवळा असलेली आणि गरीबांविषयी कणव बाळगून त्यांच्यासाठी धडपडणारी नायिका पाहतो. पडद्यावरील हा नायक किंवा नायिका प्रत्यक्ष राजकारणात येते, त्यावेळी पडद्यावरील भूमिकेप्रमाणेच राजकारणातील प्रतिमाही असावी, असेच लोकांना वाटते. त्या पद्धतीने लोकांसाठीच राजकारणाच्या माध्यमातून प्रयत्न केल्यास यश मिळते, हे जयललिता यांच्यासारख्या कलावंताने दाखवून दिले आहे. संवेदनशीलता हा जगण्याचा मुख्य गाभा असतो. पडद्यावरील भूमिका निभावताना आणि वास्तवातील भूमिका निभावताना मनातील संवेदनशीलता जपणारेही असतात. म्हणूनच चंदेरी दुनियेतील स्वप्नांच्या जगात जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या मनात काही कलावंत देवाचे रूप बनून राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com