मेरठनंतर अलाहाबादमध्ये 'वंदे मातरम'वरून वाद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

"वंदे मातरम' म्हणण्यावरून मेरठ महानगरपालिकेत निर्माण झालेल्या वादानंतर अलाहाबाद महानगरपालिकेनेही सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी "वंदे मातरम' म्हणण्याचा नियम आणण्याची मागणी केली आहे. या मागणीला काही सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.

अलाहाबाद (उत्तर प्रदेश) - "वंदे मातरम' म्हणण्यावरून मेरठ महानगरपालिकेत निर्माण झालेल्या वादानंतर अलाहाबाद महानगरपालिकेनेही सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी "वंदे मातरम' म्हणण्याचा नियम आणण्याची मागणी केली आहे. या मागणीला काही सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.

अलाहाबाद महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी "वंदे मातरम' आणि संपल्यानंतर "जन गण मन' म्हणण्याचा नवा नियम आणण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यामुळेच त्यांच्या पक्षाचे सदस्य अशी मागणी करत असल्याचा आरोप सभागृहातील विरोधकांनी केला. त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

"वंदे मातरम' म्हणण्यास नकार देणाऱ्या नगरसेवकांना महानगरपालिकेच्या सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठराव मेरठ महानगरपालिकेने नुकताच संमत केला आहे. या ठरावाला अद्याप सरकारची मान्यता मिळणे बाकी आहे. फार पूर्वीपासून मेरठ महानगरपालिकेत "वंदे मातरम' म्हणण्याची प्रथा आहे. ज्या सदस्यांना त्यात सहभागी व्हायचे नाही, ते सदस्य "वंदे मातरम' संपल्यानंतर सभागृहात येतात. 80 सदस्यांच्या मेरठ महानगरापालिकेत 45 सदस्य भाजपचे आहेत.