गुजरात विधानसभेसाठी राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

महेश शहा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

काँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य

अहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.

काँग्रेसचे 125 जागांचे लक्ष्य

अहमदाबाद: गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांसमोर 125 जागांचे लक्ष्य ठेवले.

राहुल गांधी हे आज एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. त्या वेळी साबरमती नदी पात्राजवळ झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले,""गुजरातमधील भाजप सरकारच्या तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशामुळे काँग्रेसला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या कर्जाचा फायदा उद्योजकांना दिला जात आहे.''

मोदी सरकारने केलेली नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली सदोष असल्याची टीका त्यांनी केली. गुजरातमधील दलित आणि आदीवासी समाज, महिला तसेच मुलांच्या प्रश्‍नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. गुजरातमधील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक तज्ज्ञ आदींशी थेट संवाद साधताना राहुल यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी प्रथमच चार हजार किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. ते आठ दिवसांच्या रोड शो ला येत्या 22 सप्टेंबरपासून द्वारका येथून प्रारंभ कारणार आहेत. ते 22 व 23 सप्टेंबरला सौराष्ट्रात त 24 व 25 ला उत्तर गुजरातमध्ये असणार आहेत. त्यानंतर पुढील चार दिवस ते मध्य आणि दक्षिण गुजरातमधील पक्षाच्या विविध प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी दिली.