गुजरातमध्ये पुढील महिन्यांत 'व्हीव्हीआयपीं'ची मांदियाळी

महेश शहा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमध्ये सप्टेंबर महिना हा "हायप्रोफाइल' भेटींचा महिना ठरणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गुजरातच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्यानंतर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत असून, शेवटी सप्टेंबरच्या मध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन सप्टेंबरला गुजरातला येत असून ते सौराष्ट्र, मेहसाणा व अहमदाबादला भेट देणार आहेत. नर्मदा नदीवरील साउनी परियोजनेच्या चौथ्या टप्प्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती होण्यापूर्वी कोविंद अखील भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष असल्याने गुजरातच्या कोळी समाजाशी सतत संपर्कात असत. गुजरातला ते वारंवार भेट देत असत. मेहसाणा येथील जैन मंदिरालाही राष्ट्रपती भेट देण्याची शक्‍यता आहे.

चार सप्टेंबरला कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अहमदाबादहून कॉंग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ करतील. भाजपच्या विकास व वाढीच्या अजेंड्याला कॉंग्रेस या वेळी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यात उमेदवार निवडीसाठी समितीची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे.

सप्टेंबरच्या मध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे तीन दिवसांच्या भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान विविध विषयांवरील करारांवर स्वाक्षऱ्या होतील. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरला असून, त्या दिवशी ते नर्मदा प्रकल्पाच्या यशानिमित्त आयोजित नर्मदा यात्रेत सहभागी होणार आहेत.