कापड व्यापाऱ्यांचा सुरतमधील संप मागे

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर निर्णय

अहमदाबाद : वस्तू व सेवाकराला (जीएसटी) विरोध दर्शविण्यासाठी सुरतमधील व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप अखेर दोन आठवड्यांनंतर बुधवारी मागे घेतला. केंद्र सरकारने कपड्यांवरील जीएसटीबाबत फेरविचार करण्याचे आश्‍वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.

सुरतमधील हजारो व्यापारी दोन आठवड्यांपासून दुकाने बंद ठेवून जीसएटीला विरोध करीत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. कापड व्यापारी मनोज अगरवाल म्हणाले, ""केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कपड्यांवरील जीएसटीचा मुद्दा जीएसटी परिषदेच्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. या बैठकीत निर्णय होईपर्यंत संप मागे घेण्यात आला आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा संप सुरू होईल. कपड्यांवरील पाच टक्के जीएसटी मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे.''

देशातील सुरत ही मोठी कापड बाजारपेठ आहे. कपड्यांवर जीएसटी लागू करण्याला विरोध करीत 3 जुलैपासून व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. रिंग रोड परिसरात व्यापाऱ्यांकडून निदर्शनेही सुरू होती. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तसेच, दगडफेकीच्याही घटना घडल्या होत्या. व्यापाऱ्यांनी 8 जुलै रोजी मूक मोर्चाही काढला होता.