दोन युद्ध आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची भारताची क्षमता

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

संपूर्ण कारवाई करण्यास हवाई दल तयार आहे. मात्र, हवाई दलाचा सहभाग असलेल्या लक्ष्यवेधी कारवाईबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सक्षम आहोत

नवी दिल्ली - चीनशी सामना करण्यास भारतीय हवाई दल सक्षम असून दोन युद्ध आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याचे आव्हानही पेलण्यास तयार आहे, असा विश्‍वास हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज व्यक्त केला.

हवाई दल दिनाच्या पूर्वसंध्येला एअर चीफ मार्शल धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. "संपूर्ण कारवाई करण्यास हवाई दल तयार आहे. मात्र, हवाई दलाचा सहभाग असलेल्या लक्ष्यवेधी कारवाईबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सक्षम आहोत,' असे धनोआ यावेळी म्हणाले. गेल्याच महिन्यात लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दोन आघाड्यांवर सज्ज राहण्याची आवश्‍यकता असल्याचे म्हटले होते.

पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना चीनही आक्रमक पवित्रा घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रावत यांनी हे विधान केले होते.

सुधारणांचा आढावा
भारतीय लष्करामधील महत्त्वाकांक्षी सुधारणा प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आढावा घेतला. या सुधारणांअंतर्गत युद्धसज्जता वाढविण्यासाठी जवळपास 57 हजार अधिकारी आणि इतर पदे भरली जाणार आहेत. ले. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या शिफारसींच्या आधारावर लष्कराने सुधारणा प्रक्रिया सुरू केली आहे. सीतारामन यांनी यावेळी घेतलेल्या बैठकीला लष्कर आणि हवाई दल प्रमुखांसह संरक्षण मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये तिन्ही संरक्षण दलांच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला गेला.