अजमेर स्फोटप्रकरणी दोघांना जन्मठेप

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान, बॉंबस्फोट घडविणे आणि धार्मिक भावना चिथावणे या तीन मुख्य आरोपांतर्गत तीनही आरोपी दोषी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते

अजमेर - राजस्थान राज्यातील अजमेर येथील दर्ग्यात 2007 मध्ये घडविण्यात आलेल्या बॉंबस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने आज (बुधवार) दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालयाने या खटल्यासंदर्भात भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांसह सुनील जोशी हा आरोपीदेखील दोषी असल्याचा निर्णय 8 मार्च रोजी सुनाविला होता. गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान, बॉंबस्फोट घडविणे आणि धार्मिक भावना चिथावणे या तीन मुख्य आरोपांतर्गत तीनही आरोपी दोषी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. या पार्श्‍वभूमीवर, पटेल व गुप्ता यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बॉंबस्फोट झाल्यानंतर जोशी याचा रहस्यमयरित्या मृत्यु झाला होता. पटेल व जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत. या खटल्यामधील इतर आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद व इतरांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

अजमेरमधील ख्वाजा चिश्‍ती दर्ग्यामध्ये रमझानच्या महिन्यात (11 ऑक्‍टोबर,11) घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये तीन नागरिक मृत्युमुखी पडले होते; तसेच 17 जखमी झाले होते.

Web Title: Ajmer blast case: Gupta, Patel awarded life imprisonment