अखिलेश यांच्या रथयात्रेचे चाक रुतले

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

आता जाहीर सभांवर भर; मुख्यमंत्र्यांची उमेदवार यादी नेताजींकडे

आता जाहीर सभांवर भर; मुख्यमंत्र्यांची उमेदवार यादी नेताजींकडे

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या रथयात्रेला ब्रेक दिला आहे. पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर अखिलेश यांची रथयात्रा सुरू होणार होती. झाशी आणि महोबा या दोन ठिकाणांवर मंगळवारी रथयात्रा काढण्यात येणार होती. आता याऐवजी ते झाशी आणि महोबा या ठिकाणांवर ते जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. महोबा येथे विद्युत योजनेचा शुभारंभ अखिलेश यांच्या हस्ते होणार असून, झाशीमध्ये ते मोठी सभा घेतील. उद्या (ता. 28) रोजी होणाऱ्या या दोन्ही सभांसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यांच्याकडे 403 उमेदवारांची यादी सुपूर्द केली असून, ते स्वत: झाशी आणि बबीना या दोन ठिकाणांवरून निवडणूक लढवू शकतात. यामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्वांचलमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा राजकीय फायदा भाजपला झाला होता. याचे पडसाद "यूपी'प्रमाणेच बिहारमध्येही उमटले होते. याला प्रत्युत्तर म्हणून मुलायमसिंह यांनी आझमगडमधून निवडणूक लढविली होती; पण याचा त्यांना फारसा लाभ झाला नव्हता.

बुंदेलखंडवर लक्ष
अखिलेश यादव हे आता बुंदेलखंडमधून निवडणूक लढणार असून, याचा समाजवादी पक्षाला कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. मागील दीड दशकांपासून बुंदेलखंडमधील विधानसभेच्या दहा जागांवर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे नियंत्रण आहे. "बसप'च्या जागा जिंकून हा गड आणखी मजबूत करण्याचा समाजवादी पक्षाचा विचार आहे.

राज बब्बर भडकतात तेव्हा
सहारनपूर : येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांवर भडकलेले कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी कार्यकर्त्याचे केस ओढले. काही कार्यकर्त्यांनी हा प्रसंग मोबाईलवर रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. दरम्यान, पक्षाने अद्याप यावर कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही उत्साही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने राज बब्बर भडकले होते.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे खासगी कंपन्यांसारखे आहेत. या पक्षांकडून ज्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे, ती मंडळी निवडणूक लढतीलच, हे निश्‍चित नसून भाजप मात्र एकदा उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पुन्हा त्यात बदल करणार नाही.
केशवप्रसाद मौर्य, प्रदेशाध्यक्ष भाजप

Web Title: Akhiles poliltics in UP