2022 मध्ये मुख्यमंत्री निवास गंगाजलने स्वच्छ करू- अखिलेश

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

योगी आदित्यनाथ वयाने मोठे असले तरी, काम करण्यात आमच्या पाठीमागे आहेत. मुख्यमंत्री निवासावर होत असलेल्या पूजांमुळे त्याठिकाणी असलेल्या मोरांची मला काळजी आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात 2022 मध्ये पुन्हा एकदा समाजवादी पक्षाचे (सप) सरकार स्थापन होईल. त्यावेळी मुख्यमंत्री निवासात प्रवेश करण्यापूर्वी ते गंगाजलने स्वच्छ करण्यात येईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपने 300 पेक्षा अधिक जागा जिंकत मोठा विजय मिळविला होता. योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर समाजवादी पक्षाने आज (शनिवार) बैठकीचे आयोजन केले होते. 

या बैठकीनंतर अखिलेश यादव म्हणाले, की आम्ही पराभवाची कारणे शोधली असून, अजूनही त्यावर विचार करण्यात येणार आहे. 15 एप्रिलपासून आम्ही सदस्य अभियान सुरु करणार आहोत. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक 30 सप्टेंबरपूर्वी घेण्यात येईल. अधिकारी झाडू हातात घेऊन साफसफाई करत आहेत. आम्हाला माहिती नव्हते, अधिकारी एवढी चांगली सफाई करतात. योगी आदित्यनाथ वयाने मोठे असले तरी, काम करण्यात आमच्या पाठीमागे आहेत. मुख्यमंत्री निवासावर होत असलेल्या पूजांमुळे त्याठिकाणी असलेल्या मोरांची मला काळजी आहे. 2022 मध्ये सतत पुनरागमन केल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीत गंगाजल भरून ते साफ करून घेऊ. काँग्रेसबरोबर अजूनही आमची आघाडी टिकून आहे.

Web Title: Akhilesh Yadav attacks on yogi Adityanath government