अयोध्या वाद सोडविण्यास तयार- मुस्लिम लॉ बोर्ड

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

1986 मध्ये कांची कामकोटीचे तत्कालीन शंकराचार्य आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये झालेली चर्चा अयशस्वी झाली. 1990 मध्येही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव, मुख्यमंत्री मुलायमसिंह रावत आणि भैरोसिंह शेखावत यांच्याबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली होती.

नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमीबाबतच्या वादावर चर्चेतून तोडगा काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीबाबत सकारात्मक प्रतिसाद देताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद यांनी न्यायालयाबाहेर वाद सोडविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

रामजन्मभूमीबाबतचा वाद हा संवेदनशील आणि भावनांशी निगडित असून, याच्याशी संबंधित असलेल्या सर्वांनी वाद सोडविण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. न्यायालयाच्या मतानंतर बाबरी मशिद कृती समितीसह काही मुस्लिम संघटनांनी साशंकता व्यक्त केली होती. या वादावर न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचे यापूर्वी झालेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे या संघटनांनी म्हटले होते.

मौलाना रशीद यांनी म्हटले आहे, की न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही न्यायालयाबाहेर हा वाद सोडविण्यास तयार आहोत. 1986 मध्ये कांची कामकोटीचे तत्कालीन शंकराचार्य आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये झालेली चर्चा अयशस्वी झाली. 1990 मध्येही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव, मुख्यमंत्री मुलायमसिंह रावत आणि भैरोसिंह शेखावत यांच्याबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली होती.

सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत तोडगा निघाल्यास आम्हाला मान्य आहे. आमचा सरन्यायाधीशांवर विश्‍वास आहे. त्यांनी यासाठी एखाद्या गटाची नेमणूक करून त्यांच्यामार्फत चर्चा घडवून आणल्यास, तेही मान्य आहे. मात्र, न्यायालयाबाहेर तडजोड अशक्‍य वाटते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश काढल्यास त्याचा विचार करू, असे बाबरी मशिद कृती समितीचे समन्वयक जाफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे.

Web Title: all india muslim personal law board ready for out of court settlement under sc directives in ram mandir case