मशिदींचा मालक अल्ला; मुस्लिम बोर्ड नव्हे: ओवैसी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शिया, सुन्नी, बरेलवी, सुफी, देवबंदी, सलाफी अशा विविध समुदायांकडून मशिदींचे व्यवस्थापन केले जाते. मात्र ते मशिदींचे मालक नाहीत. या मशिदींची मालकी ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाकडेही नाही. अल्ला व कयामतवर विश्‍वास असणारे लोकच या मशिदींची निर्मिती करत असतात

हैदराबाद - "इस्लामी धर्मस्थळांचा (मशीद) मालक हा अल्ला असतो; आणि एखादा मौलाना म्हणतो म्हणून या मशिदींचे हस्तांतरण करता येणार नाही,' अशी टीका एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

अयोध्या येथील राममंदिरासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात उत्तर प्रदेशातील शिया वक्‍फ बोर्डाने व्यक्‍त केलेल्या भूमिकेचा संदर्भ ओवैसी यांच्या या विधानास आहे. अयोध्या येथील वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर मुस्लिम बहुसंख्य भागामध्ये मशीद बांधती येईल, असे बोर्डाने न्यायालयास सांगितले आहे. ओवैसी यांनी या पार्श्‍वभूमीवर संताप व्यक्‍त केला आहे.

"शिया, सुन्नी, बरेलवी, सुफी, देवबंदी, सलाफी अशा विविध समुदायांकडून मशिदींचे व्यवस्थापन केले जाते. मात्र ते मशिदींचे मालक नाहीत. या मशिदींची मालकी ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाकडेही नाही. अल्ला व कयामतवर विश्‍वास असणारे लोकच या मशिदींची निर्मिती करत असतात,'' असे ओवैसी यांनी म्हटले आहे.