उत्तर प्रदेशात फटाक्‍यांमध्ये 'अमरसिंह की फुलझडी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

लखनौ - दिवाळी आणि राजकारणाचा संबंध उत्तर प्रदेशात वेगळाच आहे. फटाक्‍यांची या वेळची नावे पाहिल्यावर हे लक्षात येते. सत्तारूढ समाजवादी पक्षातील "यादवी' आणि पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून लष्कराने केलेल्या लक्ष्याधारित हल्ल्यांचा (सर्जिकल स्ट्राइक) परिणाम यंदा फटाक्‍यांच्या नावांवर झाला आहे.

राज्यात गेली दोन वर्षे मोदी फटाक्‍यांचा वरचष्मा होता. पण, यंदा "यादवी'चा परिणाम नावांवर झाला असून, "समाजवादी का टॅग वॉर' या नावाने फटाके आले आहेत. "यादवी'त सहभागी असलेल्या नेत्यांनाही फटाक्‍यांवर झळकण्याचे भाग्य लाभले आहे. त्यात मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांचे काका रामगोपाल यादव, "नेताजी' मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांचा समावेश आहे. "रामगोपाल यादव की लाल मिर्च बॉंब' आणि "अमरसिंह की फुलझडी' या नावांना खरेदीदारांची पसंती असल्याचे दिसते. लष्कराने केलेल्या लक्ष्याधारित कारवाईचा परिणामही फटाक्‍यांवर झाला आहे. अनेक फटाक्‍यांचा समावेश असलेला "छटाई' नावाचा प्रकार लक्ष वेधून घेत आहे. "सर्जिकल स्ट्राइक' नावाच्या फटाक्‍याच्या कव्हरवर कारवाई करणाऱ्या शस्त्रसज्ज सैनिकांचे चित्र आहे. हे सर्व फटाके बाजारात चांगले चालले आहेत आणि त्यांना मागणीही असल्याचे महंमद इरफान या विक्रेत्याने सांगितले.

मिठाईचीही चलती
फटाक्‍यांबरोबरच रंगीबेरंगी मिठायांनी बाजारपेठ सजली आहे. साखरमुक्त, कमी उष्मांक असलेल्या मिठाया खवय्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पायसम, लाडू, ओट आणि खजुरापासून बनवलेल्या गुजिया (करंज्या), मुबलक सुकामेवा असलेल्या बर्फीचीही धूम आहे.