गोव्यात अमेरिकन महिलेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

अमेरिकन राष्ट्रीयत्व असलेल्या पर्यटक महिलेने अशाच प्रकारे या वर्गात प्रवेश घेतला. यात वाड्यावर दुसरीकडे तुला आयुर्वेदिक पद्धतीने मसाज करतो असे सांगून नेले व तिथे सदर महिलेवर बलात्कार केला.

पेडणे: तुमवाडो-कोरगाव येथे मुळ सुरत-गुजरात येथील योग प्रशिक्षक प्रतिक अग्रवाल उर्फ योगी चैतन्य (वय 34) याने आपल्यावर योगा शिकविण्याच्या नावावर बलात्कार केल्याची तक्रार अमेरीकेच्या 32 वर्षीय महिलेने तर 35 वर्षीय कॅनडा राष्ट्रीयत्व असलेल्या महिलेने संशयिताने आपला विनयभंग केल्याचे तक्रार केल्यानंतर पेडणे पोलिसांनी संशयिताला अटक केली.

पेडणे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुमवाडो-कोरगाव येथे संशयित प्रतिक अग्रवाल उर्फ योगी चैतन्य याने एक घर भाड्याने घेतले व त्यात त्याने 'स्कूल ऑफ हेल्दी स्ट्रीक योगा अँड आयुर्वेदा' नावाने योग प्रशिक्षण देण्याचे वर्ग 2 जानेवारीपासून सुरू केले होते. आपल्या या वर्गाचे तो ऑनलाईन प्रवेश देत होता. त्याला विदेश पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत होता. अमेरिकन राष्ट्रीयत्व असलेल्या पर्यटक महिलेने अशाच प्रकारे या वर्गात प्रवेश घेतला. यात वाड्यावर दुसरीकडे तुला आयुर्वेदिक पद्धतीने मसाज करतो असे सांगून नेले व तिथे सदर महिलेवर बलात्कार केला.

सदर महिलेने यासंबंधी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार केली. यासंबंधी कॅनडा नागरिकत्व असलेले दुसऱ्या एका पर्यटक युवतीला सदर योग शिक्षकाबद्दल तक्रार केल्याची माहिती कळल्यावर तिनेही पेडणे पोलिस ठाण्यात येऊन योगा शिकविण्याच्या नावावर या योगा प्रशिक्षकाने आपणाला मसाज करण्याच्या बहाण्याने कपडे उतरवून आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पेडणे पोलिस ठाण्यात केली.

याप्रकरणी पेडणे पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार व विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली. या प्रकरणी संशयितास न्यायालासमोर हजर केले असता चौकशीसाठी त्याला 8 दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. संशयिताची व फिर्यादीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदर योगप्रशिक्षकाजवळ मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र तसेच त्याने आरोग्य खात्याची मान्यता व ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेतला आहे का यासंबंधी पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल परब हे पुढील तपास करीत आहेत.