आम्ही बोलणारा पंतप्रधान दिला: अमित शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

राहुल गांधी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या गोष्टी करतात; पण त्यांनी राजीव गांधी फाउंडेशनसाठी घेतलेली जमीन शेतकऱ्यांना अद्याप परत दिलेली नाही.
स्मृती इराणी, केंद्रीयमंत्री

भाजपचे अध्यक्ष अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

अमेठी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुन्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसने त्यांच्या राजवटीत नेमकी कोणती कामे केली, असा सवाल करत शहा यांनी आम्ही देशाला बोलणारा पंतप्रधान दिल्याचे सांगितले. राहुल गुजरातवरील प्रगतीवर टीका करतात; पण त्यांच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केले, असा सवालही त्यांनी येथील सभेत बोलताना केला.

आम्ही मागील तीन वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा राहुल मागत आहेत, पण अमेठीतील जनतेला तुमच्या तीन पिढ्यांनी काय केले, हे जाणून घ्यायचे आहे. मागील साठ वर्षांपासून आपण कुटुंबावर विश्‍वास टाकत आहात. आता भाजप आणि मोदींवर एकदा विश्‍वास ठेवून पाहा, तुमचा विश्‍वासघात होणार नाही, असे शहा यांनी नमूद केले. या वेळी व्यासपीठावर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित होते.

दोन मॉडेल
विकासाची दोन मॉडेल आहेत, यातील एक नेहरू- गांधीवादी आणि दुसरे मोदी मॉडेल आहे. कॉंग्रेसने सत्तर वर्षे देशावर राज्य केले. खुद्द राहुल गांधी अनेक दिवसांपासून येथील खासदार असतानाही येथे अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय, क्षयरोगाच्या उपचारासाठीचे रुग्णालय आणि आकाशवाणी केंद्रदेखील होऊ शकले नाही. गोमती नदीच्या प्रवाहामुळे होत असलेली जमिनीची झीजही थांबली नसल्याचे त्यांनी सांगितले.