जयच्या कंपनीत भ्रष्टाचार झालाच नाही - अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कॉंग्रेसवर गैरव्यवहार केल्याचे अनेक आरोप करण्यात आले आहे. मात्र त्यांनी कधी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे काय? अशा प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे धाडस त्यांनी का दाखविले नाही? जय याने मात्र अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे

अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवारी) आपला मुलगा जय याच्या कंपनीत गैरव्यवहार झालाच नसल्याचे म्हटले आहे. एका संकेतस्थळाने 2014 मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून जय यांच्या कंपनीत गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात शहा हे एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

भाजपाध्यक्षांनी यावेळी कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ""कॉंग्रेसवर गैरव्यवहार केल्याचे अनेक आरोप करण्यात आले आहे. मात्र त्यांनी कधी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे काय? अशा प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे धाडस त्यांनी का दाखविले नाही? जय याने मात्र अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे,'' असे शहा म्हणाले.

कॉंग्रेसने याबाबतीत सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर भाजपने हे वृत्त बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. जय यांनी भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा करणाऱ्या संकेतस्थळाच्या विरोधात गेल्या 9 ऑक्‍टोबर रोजी अहमदबाद येथील स्थानिक न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.