प्रचाराच्या मैदानात शहांचा शड्डू 

Amit Shah
Amit Shah

अहमदाबाद : गुजरातमधील राजकीय प्रचाराची धुळवड शिगेला पोचली असताना भाजपचे राष्ट्रीय अमित शहा आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शड्डू ठोकला आहे. शहा यांच्या गुजरात दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला असून जेटली यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घ्यायला सुरवात केली आहे. अमित शहा अक्षरश: पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे गुजरातमध्ये फिरत असून यावेळेस ते विक्रमी प्रचारसभा घेणार आहेत. 

अहमदाबादमधील भाजपचे मुख्यालय राजकीय घडामोडींचे हॉटस्पॉट बनले आहे. अमित शहा यांनी कच्छच्या गांधीधाममधून आज प्रचारास सुरवात केली. मोर्बी, सुरेंद्रनगर, भावनगर, बोताड, अमरेली आणि अहमदाबाद शहरामध्येही त्यांनी प्रचारसभा घेतल्या. उद्या (ता.5) रोजी शहा हे आदिवासी भागाचा दौरा करणार असून ते वलसाड, नवसारी, डांग, पंचमहाल, दाहोद, सबरकांठा आणि अरवली येथेही सभा घेणार आहेत. शहा हे सात नोव्हेंबर रोजी राजकोट शहर आणि ग्रामीण तसेच सुरतमध्येही सभा घेतील. शहा हे 8 नोव्हेंबर रोजी जुनागड शहर आणि ग्रामीण, पोरबंदर, गीर, सोमनाथ, भरूच, नर्मदा, आनंद, खेडा आणि म्हैसनगर येथेही सभा घेणार आहेत, यानंतर 9 नोव्हेंबर रोजी ते सुरत जिल्हा, तापी, जामनगर शहर आणि ग्रामीण, देवभूमी द्वारका, बडोदा शहर, छोटा उदयपूर आणि बडोदा जिल्ह्याचा अन्य भाग पिंजून काढणार आहेत. 

जेटलींच्या भेटीगाठी 
विधानसभा निवडणुकीचा प्रचारसंपेपर्यंत अमित शहा हे राज्यामध्येच राहणार आहेत. जेटली यांनी आज भाजपचा जाहीरनामा तयार करणाऱ्या पथकाची भेट घेत त्याच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. ते भाजपच्या माध्यम, सोशल मिडिया समितीशीही चर्चा करणार आहेत तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नेत्यांचीही ते भेट घेतील. स्थानिक उद्योजकांच्या संघटनांशाही ते संवाद साधणार आहेत. निवडक पत्रकारांशी त्यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले आहे. 

"आरक्षणावर सोनिया निर्णय घेतील' 
कॉंग्रेस पक्षाकडून मोठ्या आशा बाळगणारे पटेल समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आरक्षणाबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीच निर्णय घेतील असे म्हटले आहे. पटेल आरक्षणाबाबत कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू असून कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनाही याच्या नेमक्‍या मर्यादा माहिती आहेत असे हार्दीक यांनी नमूद केले. येत्या 8 नोव्हेंबर पर्यंत कॉंग्रेस पक्ष आपली आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करेल अशी आम्हाला आशा आहे. तत्पूर्वी हार्दीक यांनीच कॉंग्रेसला 7 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन ठरवून दिली होती. 

भाजप विजयी होईच : जमाते इस्लामी 
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचेच सरकार बनेल असा विश्‍वास "जमाते इस्लामी' या मुस्लिम संघटनेने व्यक्त केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन उमरी म्हणाले की, विविध कल चाचण्यांनी भाजपचेच सरकार येईल असा दावा केला आहे. राज्यामध्ये मुस्लिम मात्र भाजपला मतदान करण्याची शक्‍यता कमीच आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मेहनत घेत असले तरीसुद्धा त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com