अमित शहांनी घेतली माध्यम प्रमुखांची शाळा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 मे 2017

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या कामांचा डांगोरा पिटण्याच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्षाच्या देशभरातील प्रसार माध्यम प्रमुखांची दिल्लीत "शाळा' घेतली. या सरकारच्या न झालेल्या कामांबाबत पत्रकार किंवा विरोधकांनी अडचणीचे प्रश्‍न उपस्थित केले तर, त्यांना कशा पद्धतीने टोलवायचे यासाठी आकडेवारीने भरगच्च असलेले एक पॉवर पॉइंट सादरीकरणही त्यांना देण्यात येणार आहे.

शहा यांनी आज दुपारी या कार्यशाळेचे उद्‌घाटन केले. संघटनमंत्री रामलाल, राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांसह देशभरातील सुमारे 250 माध्यम प्रमुख या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेत सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचे ढोलताशे बडविण्याचा संदेश देतानाच सरकारबद्दल नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या, तर त्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या माध्यम विभाग प्रमुखाची असेल, अशी तंबीही दिल्याचे समजते. देशात रोजगारनिर्मिती ठप्प झाल्याच्या परिस्थितीबाबत कसा बुद्धीभेद करायचा याचेही मार्गदर्शनही करण्यात आले. सरकारच्या यशस्वी योजनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची सूचना शहा या वेळी केली.

या बैठकीत विशेषतः केरळ, पश्‍चिम बंगाल व त्रिपुरातील माध्यम प्रमुखांना खास सूचना केल्याचे कळते. ही बैठक पक्षांतर्गत असल्याचे सांगून भाजपने तिची अधिकृत माहिती देण्याचे टाळले. दरम्यान, शहा दिल्लीत राष्ट्रीय व प्रादेशिक प्रसार माध्यम प्रतीनिधींशी-संपादकांशी वेगवेगळी चर्चा करतील. साधारणतः (ता. 28) मेपासून हा संवाद कार्यक्रम सलग तीन ते चार दिवस चालेल, असे पक्षसूत्रांनी सांगितले.