अमित शहांकडून दिल्लीचे अभिनंदन, बंगालला चिमटे

टीम ई सकाळ
बुधवार, 26 एप्रिल 2017

शहा म्हणाले, "मोदींच्या तीन वर्षांच्या कामकाजावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. मी बंगालच्या उत्तर भागात गेलो होतो. तिथे भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे."

नवी दिल्ली : मोदींच्या विजयरथाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. नकारात्मक राजकारण, निमित्ताचे राजकारण चालणार नाही असा स्पष्ट संदेश दिल्लीच्या जनतेने दिला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी यावेळी येथील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले. 

अमित शहा सध्या बंगालमध्ये तीन दौऱ्यांवर आहेत. दीनदयाळ जन्मशताब्दीनिमित्त भाजपचे देशभरातील साडेतीन लाख कार्यकर्ते 15 दिवस, एक महिना आणि काहीजण एक वर्षासाठी पूर्ण वेळ काम करणार आहेत. या उपक्रम उत्तेजन देण्यासाठी शहा स्वतः 15 दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. 

माध्यमांशी बोलताना शहा म्हणाले, "मोदींच्या तीन वर्षांच्या कामकाजावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. मी बंगालच्या उत्तर भागात गेलो होतो. तिथे भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. 

बंगालमध्ये डाव्यांचे सरकार गेल्यानंतर विकास होईल अशी आशा लोकांना होती. मात्र, ती आशा फोल ठरली. येथे 3 लाख 50 हजार कोटींचे कर्ज बंगाली जनतेवर असून, भ्रष्टाचार कमी होण्याचे नाव घेत नाही. बंगालची जनता राज्यकर्त्यांना जाब विचारत आहे. पूर्वी बँकांमध्ये जमा ठेवींमध्ये बंगालचा हिस्सा 18 टक्के होता. डाव्या सरकारच्या काळात तो 12 टक्क्यांवर आला, आणि आता तर हा हिस्सा केवळ सहा टक्क्यांवर आला आहे.
 

Web Title: Amit shaha congrats delhi, pinches mamata banerjee