साठा 'उत्तरां'ची कहाणी... 

प्रकाश अकोलकर 
रविवार, 12 मार्च 2017

हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचं तर आहेच; पण त्याहीपेक्षा ते यश अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूकपूर्व रणनीतीचंही आहे. त्यामुळेच अवघ्या अडीच-तीन वर्षांपूर्वीच्या 'मोदी लाटे'त मिळवलेल्या मतांची टक्‍केवारी जवळपास कायम राखण्यात भाजपला कधी नव्हे एवढं यश आलं आहे! 

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशानं साऱ्याच निवडणूक विश्‍लेषकांना 'चकित' केलं आहे! अगदी निकालांच्या आधी मतदान चाचण्या घेऊन आपले अंदाज व्यक्‍त करणाऱ्यांनाही उत्तर प्रदेशातील तथाकथित 'अशिक्षित आणि गावंढळ' अशा विशेषणांनी सतत तुच्छ समजल्या जाणाऱ्या या मतदारांनी आपली ताकद इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतून दाखवून दिली आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे भाजपलाही या इतक्‍या मोठ्या यशाचा अंदाज आला नव्हता, ही आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचं तर आहेच; पण त्याहीपेक्षा ते यश अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूकपूर्व रणनीतीचंही आहे. त्यामुळेच अवघ्या अडीच-तीन वर्षांपूर्वीच्या 'मोदी लाटे'त मिळवलेल्या मतांची टक्‍केवारी जवळपास कायम राखण्यात भाजपला कधी नव्हे एवढं यश आलं आहे! 

नरेंद्र मोदी यांच्या माथ्यावर 2014 मधील मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पंतप्रधानपदाचा 'ताज' चढला, त्यास अर्थातच अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात बजावलेली कामगिरी कारणीभूत होती. देशातील या सर्वात मोठ्या राज्यातील 80 जागांमधून शहा यांनी भाजपचे 71 खासदार लोकसभेत पाठवताना पक्षाला कधी नव्हे एवढी म्हणजे 41.3 टक्‍के मतंही मिळवून दिली होती. मात्र, नंतरच्या अडीच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोदी यांच्या हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा या राज्यातील हातावर पोट असलेल्या लाखो लोकांना फटका बसल्याचं त्या राज्याचा धावता दौरा करताना दिसून आलं होतं. तरीही तेव्हाचा जनाधार जवळपास कायम राखल्याचं भाजपनं 39.6 टक्‍के मतं मिळवत दाखवून दिलं आहे. सन 2014 मध्ये भाजपनं 71 आणि मित्रपक्ष 'अपना दल'नं दोन जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजपनं 385 विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली होती. ही आघाडी टिकणं केवळ अशक्‍य होतं; असं भले भले विश्‍लेषक सांगत होते. मात्र, आता तीनशेहून अधिक जागा जिंकून, भाजपनं अद्यापही हे राज्य फार मोठ्या प्रमाणात आपल्याच पाठीशी आहे आणि मोदी यांच्यावर तेथील जनतेचा कमालीचा विश्‍वास आहे, यावर थेट जनतेकडूनच मोहोर उमटवून घेतली आहे. 

उत्तर प्रदेशातील या मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीनं आणलेल्या 'त्सुनामी'मध्ये बाकी पक्षांचा पार पालापाचोळा होऊन गेला, हे तर निकालांचे आकडेच सांगत आहेत. मात्र, याच आकड्यांची जादू अशी की या सर्वच पक्षांना म्हणजेच समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस तसंच बहुजन समाज पक्ष यांनीही आपला जनाधार कायमच राखल्याचं, हेच आकडे सांगत आहेत! 2014च्या लोकसभा निवडणुकीत 'सपा'चे अवघे पाच खासदार निवडून आले होते आणि तरीही तेव्हा त्या पक्षानं 22.20 टक्‍के मतं घेतली होती. आता 'सपा'ला तीनआकडी संख्याही गाठता आली नसली, तरीही त्या पक्षाच्या पारड्यात मतं मात्र 21.9 टक्‍के पडली आहेत! याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुलायमसिंह यांच्या घराण्यानं कितीही मोठ्या यादवीचं दर्शन गेल्या सहा-आठ महिन्यांत दाखवलं असलं, तरीही अखिलेश यादव यांच्या मागे तेव्हा उभे होते, तेवढेच लोक जवळपास उभे आहेत. हे कसं होऊ शकलं तर त्याची कारणं अनेक आहेत. कोणत्याही निवडणुकीत मतांची टक्‍केवारी अवघ्या दीड-दोन टक्‍क्‍यांनी जरी इकडे तिकडे झाली, तरी त्याचा फटका बसू शकतो. अखिलेश यादव यांना त्याचाच फटका बसला आणि नेमकं तेच मायावती यांच्या बाबतीतही घडलं. 

मायावती यांच्या 'बसप'ला मोदी लाटेत एकही जागा जिंकता आली नव्हती, तरीही त्यांच्या मागे 19.60 टक्‍के मतदार उभे राहिले होते. आताच्या या 'त्सुनामी'त तर चक्‍क मायावतींचा जनाधार वाढला असल्याचं निवडणूक आयोगाची शनिवारी संध्याकाळची आकडेवारी सांगत आहे. या वेळी थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या 'बसप'ला चांगलीच म्हणजे 22.3 टक्‍के मतं मिळाली आहेत! पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मायावतींचा पक्ष 80 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होता. तेव्हा या पक्षाला 25.9 टक्‍के मतं मिळाली होती. आता त्या मतांमध्ये घट झाली ती जेमतेम तीन टक्‍क्‍यांची; मात्र पक्ष जागांच्या रस्सीखेचात विशीही ओलांडू शकलेला नाही. -आणि अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या कॉंग्रेसची अवस्था काय झाली? 2014 मध्ये या पक्षानं अवघ्या दोनच म्हणजे रायबरेली आणि अमेठी येथील दोन जागा जिंकल्या होत्या. त्या जागा अर्थातच सोनिया आणि राहुल गांधी यांच्या होत्या आणि तेव्हा तिथं समाजवादी पक्षानं उमेदवार उभं करण्याचं टाळलं होतं. त्या मोदी लाटेत कॉंग्रेसच्या पारड्यात 7.5 टक्‍के मतं पडली होती. आता त्या मतांत जेमतेम एकच टक्‍क्‍याची घट झाली आणि तो आकडा 6.2 एवढा झाला, तरीही दोनआकडी आमदार निवडून आणण्यासाठीही या पक्षाला मोठीच झटापट करावी लागत आहे. 

हा सारा टक्‍क्‍या-दोन टक्‍क्‍यांचा खेळ जसा आहे, तसाच तो मतदारांनी एक ठाम भूमिका घेतल्याचाही परिपाक आहे. अखिलेश यादव यांनी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात आपला जाहीरनामा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जाहीर करताना 'काम बोलता है!' अशी घोषणा दिली होती आणि मोदी यांनी नंतरच्या काही तासांतच 'काम की कारनामे?' असा सवाल करून त्यांना चोख उत्तरही दिलं होतं. त्याचा हा परिपाक आहे का? की, यादव असोत की दलित की, ब्राह्मण असोत की ठाकूर आणि मुख्य म्हणजे मुस्लिम समाजही भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं एकूणच चित्र या निकालांनी उभं केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. प्रत्यक्षात उमेदवार ठरवताना भाजपनं प्रत्येक मतदारसंघातील जाती-पातींचा विचार गांभीर्यानं केला. कुठं जातींची जुळणी केली, तर कुठं फाटाफुटीचं राजकारण केलं. मुस्लिम समाजाची मतं तर सप आणि बसप यांच्यात विभागली जावीत म्हणून अमित शहा आपल्या प्रत्येक सभेत विखारी भाषणं करत होते. या अशा आगळ्या-वेगळ्या रणनीतीचंच हे यश आहे. अर्थात, त्यास मोदी यांचं 'खंबीर' नेतृत्वही कारणीभूत आहेच. त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकींनी उभ्या केलेल्या साठ प्रश्‍नांची ठाम उत्तरं देऊन मतदारांनी भाजपची कहाणी सुफळ, संपूर्ण केली आहे! 

Web Title: anant bagaitkar analyses election results in five states