द. काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांची शोधमोहीम

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

शोपियॉंमधील झैनपुरा भागातील हेफ खेड्यामध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबविली. आज सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने जवान सहभागी झाले आहेत. आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये कोणत्याही सैनिकास इजा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांविरोधात मोठी शोधमोहीम राबविली. या भागामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर या मोहिमेस गती देण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या मोहिमेमध्ये सुरक्षा दलांनी चार गावे पालथी घातली. सुरक्षा दलांची ही शोधमोहीम सुरू असताना काही माथेफिरू आंदोलकांनी जोरदार दगडफेक करत त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शोपियॉंमधील झैनपुरा भागातील हेफ खेड्यामध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबविली. आज सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने जवान सहभागी झाले आहेत. आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये कोणत्याही सैनिकास इजा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शोपियॉंतील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील बालाकोट सेक्‍टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्संनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या वेळी राजौरी जिल्ह्यातील नागरी भागासही लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी रेंजर्संनी 15 आणि 16 मे रोजी राजौरी जिल्ह्यातील तीन पट्ट्यांमध्ये तोफगोळ्यांचा मारा केला. पाकच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाचा फटका दहा हजार लोकांना बसला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना लक्षात घेता, सीमावर्ती भागातील सतराशेपेक्षाही अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.