बालदिनानिमित्त पुण्याच्या अन्विताचे गुगलवर 'डुडल'

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

या वर्षीच्या डुडल स्पर्धेची संकल्पना "इफ आय कुड टीच एनीवन एनीथिंग, इट वुड बी...' ही होती. अर्थात, "कुणाला मला काहीतरी शिकवायचे असेल, तर ते...' अशी ही संकल्पना होती.

नवी दिल्ली - विविध प्रकारच्या लक्षवेधी 'थीम्स'ने जगभरातील नेटिझन्सच्या नेहमीच चर्चेत असणाऱ्या गुगल डुडलवर यंदा पुण्याचा झेंडा फडकला असून, आज (14 नोव्हेंबर) बालदिनानिमित्त पुण्याच्या अन्विता तेलंग हिने रेखाटलेले डुडल गुगलवर झळकले आहे.

गुगलतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या 'डुडल 4 गुगल' स्पर्धेत पुण्याच्या बालेवाडी येथील विब्ग्योर हायस्कूलची विद्यार्थिनी अन्विता प्रशांत तेलंग ही राष्ट्रीय विजेती ठरली. तिने रेखाटलेल्या कल्पक, प्रेरणादायी आणि 'एन्जॉय एव्हरी मोमेंट' हे शीर्षक असलेल्या डुडलची निवड करण्यात आली होती.  

अन्विताने तयार केलेले हे डुडल आज बालदिनानिमित्त गुगल इंडियाच्या होमपेजवर प्रदर्शितही करण्यात आले आहे. या वर्षीच्या डुडल स्पर्धेची संकल्पना "इफ आय कुड टीच एनीवन एनीथिंग, इट वुड बी...' ही होती. अर्थात, "कुणाला मला काहीतरी शिकवायचे असेल, तर ते...' अशी ही संकल्पना होती. अन्विताने "एंजॉय एव्हरी मोमेंट' अर्थात, प्रत्येक क्षण आनंदाने जगा- हा संदेश देणारे डुडल तयार केले. इयत्ता चौथी ते सहावीच्या गटात अन्विताने बाजी मारली.