'अम्मां'च्या मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याने आर. के. नगर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, आचारसंहिताही ताबडतोब लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल 15 एप्रिलला लागेल.

चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याने आर. के. नगर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, आचारसंहिताही ताबडतोब लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल 15 एप्रिलला लागेल.

आर. के. नगर मतदारसंघात सलग तिसऱ्या वर्षी निवडणूक होत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून निर्दोष मुक्त केल्यानंतर जयललिता यांनी येथील पोटनिवडणूकीत विजय मिळविला होता. त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. आता त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्याने पुन्हा निवडणूक होत आहे.

दरम्यान, देशभरात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या बारा जागांसाठी नऊ आणि 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. नऊ एप्रिलला जम्मू-काश्‍मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग, तसेच 12 एप्रिलला केरळमधील मालापुरम लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. अनंतनागच्या खासदार आणि "पीडीपी'च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्‍मीरच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्याने ही जागा रिक्त झाली होती. तर, खासदार तारीक हमीद कारा यांनी राजीनामा दिल्याने श्रीनगर आणि खासदार ई अहमद यांचे निधन झाल्याने मालापुरम या जागा रिक्त झाल्या होत्या.

तमिळनाडूतील आर. के. नगर व्यतिरिक्त धेमजी (आसाम), भोरंज (हिमाचल प्रदेश), अतेर आणि बांधवगड (मध्य प्रदेश), कांती दक्षिण (पश्‍चिम बंगाल), धोलपुर (राजस्थान), नंजनगुड आणि गुंडलूपेट (कर्नाटक), लिटिपारा (झारखंड), राजौरी गार्डन (दिल्ली) आणि बुर्तुक (सिक्कीम) येथे विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

Web Title: April 12 by-election in the constituency of jaylalitha