कुपवाडा येथे पाच दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा आज (रविवार) भारतीय लष्करातील जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील शोधमोहीम आणखीन वाढवली आहे.

श्रीनगर : कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा आज (रविवार) भारतीय लष्करातील जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील शोधमोहीम आणखीन वाढवली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीनगर आणि सीमाभागाचा दौरा केला होता. राजनाथसिंह यांच्या दौऱ्यादरम्यानही केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या चकमकीत दहशतवादी मारले गेले होते. भारताने रमजान महिन्यात सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानकडून अद्यापही दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. केरन सेक्टरमध्ये आज तिसऱ्यांदा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लष्करातील जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. जवानांना पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला लष्कारातील जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादरम्यान 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

Web Title: ARMY FOILS INFILTRATION BID 5 TERRORISTS KILLED