सीमेवर दक्ष राहण्याचा लष्करप्रमुखांचा आदेश

पीटीआय
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ताबा रेषेवरील सुरक्षेचा मंगळवारी आढावा घेतला.

शत्रुपक्षाकडून होणाऱ्या धोकादायक हालचालींबाबत दक्ष राहण्याचा आदेश त्यांनी जवानांना दिला. 

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ताबा रेषेवरील सुरक्षेचा मंगळवारी आढावा घेतला.

शत्रुपक्षाकडून होणाऱ्या धोकादायक हालचालींबाबत दक्ष राहण्याचा आदेश त्यांनी जवानांना दिला. 

लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी उधमपूर येथील लष्कराच्या उत्तर विभागाच्या मुख्यालयास आज भेट दिली. भारतीय जवानांनी काल केलेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले, असा दावा
पाकिस्तानने केल्यानंतर लष्करप्रमुखांनी उधमपूरला भेट दिली. सीमेपलीकडून होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे व त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले, असे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

लष्करप्रमुख जनरल सुहाग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ताबारेषेवरील परिस्थिती व त्यांच्या अखत्यारितील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. लष्कराचे उत्तर विभागाचे मुख्यालय, हवाई दल, निमलष्करी दल,त्या भागातील नागरी प्रशासन व केंद्रीय पोलिस संघटनांमध्ये असलेला समन्वय व सहकार्य याबद्दल त्यांनी प्रसंशोद्गार काढले.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग

जम्मू ः गेल्या काही दिवसांपासून सीमेवर धुमश्‍चक्री सुरू असून, पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करीत पालनवाला विभागातील ताबा रेषेवरील गावांना व लष्करी ठाण्यांना लक्ष्य केले. आज सुरू होणाऱ्या येथील शाळा या घटनेमुळे आज बंदच ठेवण्यात आल्या, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

पालनवाला व जोगवान ठाण्याला लक्ष्य करीत येथे आज सकाळी सव्वासातच्या सुमारास विनाकारण गोळीबार सुरू केला. छोटी शस्त्रे व तोफांचाही मारा त्यांनी केला. सीमेपासून थोड्या दूर असलेल्या गावांवरही या सैन्याकडून तोफा डागल्या जात आहेत. मात्र भारतीय जवानही त्याला तोडीस तोड उत्तर देत आहेत. या चकमकीत अद्याप कोणी जखमी झाल्याचे वृत्त नसून, गोळीबार अधूनमधून सुरूच आहे, असे अधिकाऱ्याने
सांगितले.

सीमा भागातील शाळा गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. आज त्या सुरू करण्यात येणार होत्या; पण परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची सूचना जम्मूच्या उपआयुक्तांनी संबंधित विभागाचे उपविभागीय
दंडाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आजच्या घटनेनंतर सीमेवरील गावांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या, मात्र इतर ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पालनवाला विभागात काल झालेल्या चकमकीत एक नागरिक
जखमी झाला, तर पूँछमध्ये एक जवान जखमी झाला. भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’नंतर जम्मू काश्‍मीरमधील सीमेवर पाकिस्तानने २५० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.