अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार; खंडू मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

भाजप नेते राम माधव यांनी ट्विटवरून माहिती देताना सांगितले, की अरुणाचल प्रदेशात आता भाजपचे सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह 34 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पीपीएमधून निलंबित करण्यात आले होते.

ईटानगर - अरुणाचल प्रदेशातील राजकीय घडामोडीत आज (शनिवार) एक नवा बदल झाला असून, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून बडतर्फ करण्यात आलेल्या 34 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजप नेते राम माधव यांनी ट्विटवरून माहिती देताना सांगितले, की अरुणाचल प्रदेशात आता भाजपचे सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह 34 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पीपीएमधून निलंबित करण्यात आले होते. 60 जागांच्या या विधानसभेत आता भाजपची संख्या 45 आणि दोन अपक्ष अशी 47 झाली आहे. याठिकाणी भाजपचे दहा आमदार आहेत.

पेमा खंडू यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी कोणतेही कारण न दाखविता पीपीएमधून निलंबित करण्यात आल्याचा आरोपही केला. आमदारांवर अविश्वास दाखविल्याने दोन तृतीयांशहून अधिक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पीपीएने केलेली कारवाई आमच्यासाठी फायद्याची ठरली, असे खंडू यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री पीपीएने पेमा खंडू यांच्यासह 6 आमदारांना निलंबित करत तकाम पारियो यांना मुख्यमंत्री घोषित केले होते.