नोटाबंदी भाजप व मोदींचा जनविरोधी कट : केजरीवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

ज्या लोकांचा पैसा परकी बॅंकांमध्ये आहे, अशा लोकांची नावे जाहीर केल्यानंतर त्यांना अटक का केली नाही, असा प्रश्‍न विचारत केजरीवाल यांनी अशा दोन चार लोकांना तुरुंगात टाकले असते तरी भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असते.

लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली.

नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत, तर दुसरीकडे विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे. त्यामुळे नोटाबंदी ही मोठ्या उद्योजकांच्या फायद्यासाठी केली असल्याचे दिसते, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला 80 पैकी सर्वाधिक 73 खासदार निवडून दिले. मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर हीच जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही केजरीवाल या वेळी म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशामध्ये विक्रमी भ्रष्टाचार झाला आहे. नोटाबंदीमागील हेतू व त्याची अंमलबजावणी या दोन्हीही भयानक असल्याचे केजरीवाल यांनी या वेळी नमूद केले.

ज्या लोकांचा पैसा परकी बॅंकांमध्ये आहे, अशा लोकांची नावे जाहीर केल्यानंतर त्यांना अटक का केली नाही, असा प्रश्‍न विचारत केजरीवाल यांनी अशा दोन चार लोकांना तुरुंगात टाकले असते तरी भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असते, असेही ते म्हणाले.