महापालिकेत जिंकल्यास 'प्रॉपर्टी टॅक्स' नाही- केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

दिल्ली विधानसभा निवडणुकांवेळी वीजेचे दर निम्मे करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. सरकार स्थापन होताच ते पूर्ण करण्यात आले.

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळविल्यास सर्व नागरिकांचा रहिवाशी मालमत्ता कर (रेसिडेंशल प्रॉपर्टी टॅक्स) रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, की सर्व घरांचा मालमत्ता कर रद्द करण्यात येईल. याबरोबरच मागील थकबाकीही माफ करण्यात येईल. एक वर्षात दिल्ली महापालिकेला तोट्यातून फायद्यात आणू. दिल्लीतील घरे आणि नागरिकांची गणना करूनच आम्ही जबाबदारीने ही घोषणा करत आहोत. दिल्लीतील नागरिकांकडून भरण्यात येत असलेल्या मालमत्ता कराची सध्या चोरी होत आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पगारासाठी आंदोलन करावे लागणार नाही. दर महिन्याच्या 7 तारखेला त्यांच्या खात्यावर पगार जमा केला जाईल. दिल्लीतील सर्व उद्याने विकसित करण्यात येतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकांवेळी वीजेचे दर निम्मे करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. सरकार स्थापन होताच ते पूर्ण करण्यात आले, असे केजरीवाल यांनी सांगितले.