आसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा

asaram bapu to swami nityanand rape crime case
asaram bapu to swami nityanand rape crime case

नवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि आसारामबापूला दोषी ठरवले. परंतु, आसाराम बापू हे एकटेच वादग्रस्त ठरले नाहीत तर यापूर्वी अध्यात्मिक क्षेत्रातील विविध बाबांवर आरोप झाले आहेत.

आसाराम बापू
2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. शिवाय, महिला भक्तांना आशिर्वाद देण्याच्या नावाखाली तो छेडछाड करण्याबरोबरच शारिरिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. जमिन हडपणे, मुलाच्या हत्येचाही आरोप आसाराम बापूवर आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्यावर सुद्धा महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

चंद्रास्वामी
चंद्रास्वामीचे अनुयाई संत म्हणून त्याची पुजा करत होते. चंद्रास्वामीची राजकीय नेत्यांबरोबर नेहमीच उठबस असायची. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे निकटवर्तीय अशी त्याची ओळख होती. यावरूनच त्यांचे राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या संबंधाचा अंदाज येतो. चंद्रास्वामीवरसुद्धा विविध आरोप आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे षड्यंत्र रचल्याच्या आरोपाबरोबरच हवाला, शस्त्रास्त्रांची दलाली व परदेशी रक्कमेचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

संत रामपाल
रामपाल हा नावापुढे संत हा शब्द लावत होता. विविध आरोपावरून तो सध्या हिसार कारागृहात आहे. रामपाल हा संत बनण्यापूर्वी अभिंयता म्हणून सरकारी नोकरी करत होता. नोकरीचा राजीनामा देऊन त्याने सत्संग सुरु केले. पुढे सतलोग नावाने आश्रम सुरू केला. विविध आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्या आश्रमाची चौकशी केली असता तेथे वादग्रस्त वस्तूही सापडल्या. यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होऊ लागली.

---------------------------------
या लेखातील संत रामपाल यांच्याविषयीच्या उल्लेखावर त्यांच्या काही अनुयायांनी 'सकाळ'कडे निवेदन दिले आहे. ते पुढीलप्रमाणे :

या लेखामध्ये प्रसिद्ध झालेली संत रामपाल यांच्याविषयीची माहिती खोटी आहे. त्याबद्दल कोणताही पुरावा नाही. या माहितीमुळे संत रामपाल आणि त्यांचे अनुयायी यांच्या भावना दुखावल्या आहेत. संत रामपाल यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तीन आरोपांमधून त्यांची मुक्तता झाली आहे. 'बलात्कार, लैंगिक अत्याचार, गर्भपात केंद्र चालविणे' हे आरोप अद्याप कुणीही केलेले नाहीत. या परिस्थितीत चुकीची माहिती पसरविणे योग्य नाही.

(या निवेदनावर ठाकूरदास, महेंद्रदास, दत्तात्रयदास, भगवानदास, बबनदास यांच्यासह 40 जणांच्या सह्या आहेत.)

---------------------------------

नित्यानंद स्वामी
नित्यानंद स्वामीला त्याचे अनुयायी गुरू समजत होते. परंतु, सेक्स स्कॅंडलची सीडी बाहेर आल्यानंतर त्याचे भिंग फुटले. 2010 मध्ये एका अभिनेत्री सोबत शारिरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दुसरी बाजू पुढे आली. आपल्यावरील आरोप त्याने फेटाळून लावले होते. परंतु, बंगळूर येथील त्याच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला यावेळी तेथे अश्लिल साहित्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ आढळून आले होते. विविध आरोपांवरून त्याला अटक करण्यात आली होती. पुढे त्याला जामीन मिळाला.

राजीव रंजन द्विवेदी उर्फ भीमानंद
इच्छादारी संत स्वामी भीमानंद हा महाराज चित्रकूट या नावानेही ओळखला जात होता. आश्रमामध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याच्या आरोपावरून त्याला दिल्ली पोलिसांनी 2010 मध्ये अटक केली होती. चौकशीदरम्यान तो हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे आली होती. त्याच्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये 600 मुलींचा समावेश होता. विविध आरोपांवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्वामी प्रेमानंद
स्वामी प्रमानंद याचा चेहरा सत्य साई बाबा यांच्याशी मिळता-जुळता होता. त्याला मोठ्या प्रमाणवर प्रसिद्धी मिळण्याचे हे एक कारण होते. प्रेमानंदला 13 मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. यामध्ये दोषी आढळून आला होता. प्रेमानंद हा आपल्या भक्तांना पोटामधून शिवलिंग काढून दाखवत असे.

बाबा राम रहीम
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख व स्वयंघोषित धर्मगुरू बाबा राम रहीम सिंग याची अमानूष, क्रूर व लाजिरवाणी कृत्ये समोर आली आणि त्यानंतर अनेक वर्षांनी त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. या दरम्यान त्याच्या कथित भक्तांनी, समर्थकांनी खुले आम त्याला पाठिंबा दिला. आक्रमकपणे रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर त्याच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात भुयारी मार्गापासून अनेक बाबी लोकांना कळल्या. पण हे कळण्याआधी आपली महती लोकांना कळावी म्हणून बाबानेच सिनेमाचा घाट घातला होता. 2002 मध्ये एका साध्वीने राम रहीम सिंग याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. शिवाय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्याने अनेक साध्वींवर बलात्कार केल्याचे म्हटले होते. 28 ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआय न्यायालयाने त्याला 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली.

या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे खटले कसे चालतात, अशा नराधमांना काय शिक्षा केली जाते हे पाहू या.
भारतात 2013 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या बलात्कारविरोधी विधेयकानुसार 7 ते 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली जाते. अपवादात्मक प्रकरणांत बलात्काऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. तथापि, काही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित राहतात.

अमेरिका : पीडित महिलेचे वय आणि गुन्ह्याचे क्रोर्य लक्षात घेऊन जन्मठेप किंवा 30 वर्षांची शिक्षा दिली जाते.

रशिया : 3 ते 30 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा.

चीन : चीनमध्ये तर अशा गुन्ह्यांमध्ये खटला चालविणे, सुनावण्या घेणे अशा प्रक्रियेत प्रकरण प्रलंबित ठेवले जात नाही. वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले की थेट मृत्युदंड दिला जातो. सुत्रांच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये बलात्कारी नराधमाचे लिंग कापण्याची शिक्षाही दिली जाते.

इराण : बलात्कार करणाऱ्यास येथे थेट सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर फाशी दिली जाते किंवा गोळ्या घालून मारले जाते. पीडित स्त्रीने परवानगी दिल्यास मृत्युदंड रद्द होऊ शकतो, मात्र तरीही त्याला जन्मठेप किंवा चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा दिली जाते.

नेदरलँड्स : परवानगीशिवाय घेतलेल्या चुंबनासह (फ्रेंच किस) कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार हा बलात्काराएवढाच गंभीर मानला जातो. बलात्कारी व्यक्तीच्या वयानुसार त्याला 4 ते 15 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. वेश्येवरील लैंगिक अत्याचाराबद्दलही किमान 4 वर्षांची शिक्षा दिली जाते. इतर देशांमध्ये वेश्यांवरील अत्याचाराकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते.

फ्रान्स : येथे 15 वर्षे छळ करून शिक्षा दिली जाते. महिलेवर झालेल्या अत्याचाराची तीव्रता लक्षात घेऊन या शिक्षेत वाढ केली जाते. जन्मठेपही दिली जाते.

उत्तर कोरिया : येथे हुकूमशाही असून, बलात्काराच्या गुन्ह्यात कोणतीही दया दाखवली जात नाही. डोक्यात गोळी घालून बलात्कार पीडित स्त्रीला त्वरीत न्याय दिला जातो.

अफगाणिस्तान : गुन्हा केल्यापासून चार दिवसांच्या आत बलात्काऱ्याच्या डोक्यात गोळ्या घालून न्याय दिला जातो.

नॉर्वे : गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 4 ते 15 वर्षांचा तुरुंगवास.

सौदी अरेबिया : बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास खटल्याच्या काळातच दोषी व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते.

इस्राईल : किमान 4 वर्षे आणि जास्तीत जास्त 16 वर्षांची शिक्षा.

युएई : लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासाठी मरेपर्यंत फाशी. बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर 7 दिवसांत त्याला फाशी देण्यात येते. दंड किंवा नुकसान भरपाईची तरतूद येथे नाही.

पोलंड : येथे बलात्काऱ्यास डुकरांसमोर टाकून त्यांच्याकडून मृत्यू दिला जाई, असे सांगण्यात येते. अलीकडे येथे मृत्युदंडाच्या शिक्षेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

इराक : सार्वजनिक ठिकाणी मरेपर्यंत शिक्षा दिली जाते.

दक्षिण आफ्रिका : 20 वर्षे तुरुंगवास.

इजिप्त : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com