Ashadhi Wari : दिल्लीकर ‘वारकऱ्यांना’ ही विठूरायाची ओढ

विविध क्षेत्रातील भाविक आळंदीतील प्रस्थान सोहळ्यापासून सहभागी होणार
पंढरपूरच्‍या आषाढीवारीत सहभागी होणारे दिल्लीकर भाविक.
पंढरपूरच्‍या आषाढीवारीत सहभागी होणारे दिल्लीकर भाविक.Sakal

नवी दिल्ली - ‘जाईन पंढरी विठोबा पाहीन धणीभरी, संतचरण रज तेथे लोळेन प्रीती करी,’ संत रमावल्लभदासांनी वर्णन केलेल्या या अमूर्त भावनेने सावळ्या विठूरायाचे दर्शन व्हावे यासाठी दक्षिण द्वारका म्हणजे पंढरपूरच्या ओढीने जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत यंदा राजधानी दिल्लीतील वारकरीही सहभागी होणार आहेत.

आळंदीतून संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळ्यादिवशी म्हणजे येत्या २१ रोजी दिल्लीकर वारकरी वारीत सहभागी होतील. दिल्ली मराठी प्रतिष्ठान यासाठी समन्वयाचे काम करत आहे. यामध्ये सनदी अधिकारी, उद्योग, व्यापार, वकिली, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील अनेकांचा या पंढरपूर वारीत सहभाग असणार आहे. दिल्लीकरांनी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचे हे सहावे वर्ष आहे. पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात खंड पडला होता. साथ काळात २०२० व २०२१ ही दोन वर्षे आषाढीच्या दिवशी कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिर ते रामकृष्णपूरमधील विठ्ठल मंदिरापर्यंत (सुमारे १६ किलोमीटर) पायी वारी काढण्यात आली होती. त्यामध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, विनोद देशमुख, रमेश पाटील, विवेक गर्गे, गणेश रामदासी, महेंद्र लोढा, रामदास चव्हाणके आदी कुटुंबीयांसह सहभागी झाले होते.

देशभरात सध्या कोरोनाची साथ निवळल्याने दिललीकरांनी यंदा पुन्हा वारीला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे डांगे यांनी सांगितले. आषाढी वारीच्या आखणीसाठी प्रतिष्ठानने नुकत्याच बोलाविलेल्या बैठकीला मराठीजनांची मोठी उपस्थिती होती. यंदा २१ जूनपासून दिल्लीतील निवडक भक्त आळंदीहून पायी वारीला सुरवात करतील. मात्र दिल्लीतील विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याने २१ जून ते १० जुलै एवढा काळ वारीबरोबर राहणे सर्वांना शक्य होत नाही. साधारणतः दहा दिवसांत ते पंढरपूरला पोहोचतील. पुण्याला पोहोचल्यावर तेथील काही वारकऱ्यांचा गटही त्यांच्यासोबत असतो.

आम्ही पहिले तीन ते चार दिवस रोज १७ किलोमीटर चालतो. नंतर दोन टप्प्यात हे अंतर वाढवत नेतो. आळंदी, सासवड, पुणे, जेजुरी ते वाखरी व पंढरपूर या मार्गावर चालताना हवामान, पाऊस, रस्ता हे घटक पाहून रोजच्या कार्यक्रमाची आखणी करतो. यंदा आषाढी एकादशीला दिल्लीत मराठी भक्तांची वारी काढण्यात येणार आहे.

- वैभव डांगे, दिल्ली मराठी प्रतिष्ठान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com