अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

एकीकडे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा केला असतानाच या दुसऱ्या खटल्यात ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : एका बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध आसाममधील एका न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. हे जामीनपात्र अटक वॉरंट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ट्विट केल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात आसाम भाजपचे नेते सुर्य रोंगफार यांनी हा खटला दाखल केला आहे. केजरीवाल यांच्यामागील कायद्याचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा केला असतानाच या दुसऱ्या खटल्यात ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

दिल्ली महापालिका निवडणुकांच्या प्रचारामुळे केजरीवाल या खटल्याला उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगण्यात आले. 'ते मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या कामाची जबाबदारी आणि येथील निवडणुकांमुळे सुनावणीसाठी दिल्ली सोडून जाऊ शकत नाहीत,' असे केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले.