सती प्रथा पुन्हा सुरू करावी - आझम खान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे; मात्र प्रथम मला सांगा की कोणत्या मुस्लिमाने "सती प्रथेला' विरोध केला आहे. "सती प्रथा' ही हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करा

रामपूर (उत्तर प्रदेश) - राज्यात तोंडी तलावर बंदी आणण्यापूर्वी सती प्रथा पुन्हा सुरू करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे.

"तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे; मात्र प्रथम मला सांगा की कोणत्या मुस्लिमाने "सती प्रथेला' विरोध केला आहे. "सती प्रथा' ही हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करा,'' असे खान म्हणाले. तोंडी तलाकवर जे गप्प बसले आहेत, तेसुद्धा तितकेच दोषी आहेत, अशा प्रकारचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले होते. त्यावर आझम खान यांनी हे मत व्यक्त केले आहे. तोंडी तलाकवर जे नागरिक मौन बाळगून आहेत, तेसुद्धा दोषी आहेत, असे त्यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या
कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, की जर आमच्यावरील गुन्हे आणि आमची विवाह संस्था एकच असेल, तर देशात समान नागरी कायदा लागू करण्यास काय हरकत आहे. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचे उदाहरण देत मुख्यमंत्री म्हणाले, की समाज जर या घटनेवरही बोलणार नसेल, तर तोही तितकाच दोषी आहे.

तोंडी तलाक पद्धतीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केल्याने ही पद्धत बंद करण्याला चालना मिळाली आहे. भुवनेश्‍वर येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, की आमच्या मुस्लिम बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. जिल्हा स्तरावर या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला एक नवा भारत घडविण्याचे सूत्र घेऊन पुढे जायला पाहिजे; मात्र आपल्याला संथ गतीने पावले उचलून चालणार नाही, तर वेगाने पुढे जाणे गरजेचे आहे.