बाबा रामपाल दोन गुन्ह्यांतून मुक्त

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सध्या रामपाल याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने त्याला तुरुंगामध्ये राहावे लागेल. रतिया (फतेहबाद) येथील सुखदेव सिंह यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रामपाल आणि त्याचे अनुयायी पुरुषोत्तम दास, राजकुमार, मोहिंदरसिंह, राजेंदरसिंह, राहुल आणि अन्य 30 ते 40 जणांविरोधात 18 नोव्हेंबर 2014 रोजी दंगल घडविणे, बेकायदा एकत्र जमणे, सरकारी आदेशांचे उल्लंघन आदी आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता

हिसार - सतलोक आश्रमाचा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याला पुराव्याअभावी दोन गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यांतून येथील न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी आज हे आदेश दिले. सुरवातीस न्यायालयाने 24 ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी स्थगित करत ती 29 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेतला होता. "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला विशेष सीबीआयच्या न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती. रामपाल याला दोन्ही खटल्यांत न्यायालयाने निर्दोष घोषित केल्याचे त्यांचे वकील ए. पी. सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

17 नोव्हेंबर 2014 रोजी रामपाल आणि त्यांच्या अनुयायांविरोधात भादंविच्या कलम 186 (सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये व्यत्यय आणणे), कलम 332 (भीती दाखवित सरकारी कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून रोखणे), कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी गुन्हेगारी शक्तींचा वापर)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या रामपाल याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने त्याला तुरुंगामध्ये राहावे लागेल. रतिया (फतेहबाद) येथील सुखदेव सिंह यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रामपाल आणि त्याचे अनुयायी पुरुषोत्तम दास, राजकुमार, मोहिंदरसिंह, राजेंदरसिंह, राहुल आणि अन्य 30 ते 40 जणांविरोधात 18 नोव्हेंबर 2014 रोजी दंगल घडविणे, बेकायदा एकत्र जमणे, सरकारी आदेशांचे उल्लंघन आदी आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पोलिसांची कसरत
रामपाल याला 2014 मध्ये आश्रमातून अटक करताना पोलिसांना त्याच्या अनुयायांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. या वेळी पंधरा हजार अनुयायांना सतलोक आश्रमातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली होती. पोलिस आणि रामपाल समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात पाच जण मरण पावले होते. उच्च न्यायालयाने अनेकदा नोटीस बजावल्यानंतरदेखील रामपाल याने न्यायालयामध्ये उपस्थित राहणे टाळले होते, त्यामुळे त्याच्या विरोधात थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती.