बाबरी प्रकरणातील आरोपी गैरहजर, आता सुनावणी बुधवारी

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिलपासून सीबीआयच्या विशेष न्यायालयाला एक महिन्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे आणि दोन वर्षांच्या आत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

लखनौ : अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुढील सुनावणी 24 मे रोजी निश्‍चित केली आहे. सहापैकी एक आरोपी सतीश प्रधान आज न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली.

राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात 20 मेपासून दररोज होत आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेच्या पाच नेत्यांना शनिवारी जामिनावर सोडले आहे. बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिलपासून सीबीआयच्या विशेष न्यायालयाला एक महिन्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे आणि दोन वर्षांच्या आत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सुनावणीला प्रारंभ झाला आहे. मात्र सहापैकी एक आरोपी गैरहजर राहिल्याने सुनावणी 24 रोजी निश्‍चित करण्यात आली आहे.

तत्पूर्वी सीबीआयच्या न्यायालयाने या प्रकरणी सहा आरोपींना समन्स बजावले होते. त्यापैकी राम विलास वेदांतीसह पाच जण हजर झाले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आले. वेदांतीशिवाय शनिवारी जे विहिंपचे नेते हजर झाले होते त्यात चंपत राय, वैकुंठलाल शर्मा, महंत नत्य गोपाल दास आणि धर्मदास महाराज यांचा समावेश होता. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायधीश एस. के. यादव यांनी जामीन दिला होता.