विमानात जन्मलेल्या बाळास आयुष्यभर मोफत प्रवासाची भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

विमान अरबी समुद्रावरून प्रवास करीत असतानाच संबंधित महिलेने एका बाळास जन्म दिला. या विमानातून प्रवास करणाऱ्या विल्सन नावाच्या परिचारिकाने प्रसूतीसाठी कर्मचाऱ्यांना मदत केली

नवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गर्भवतीने रविवारी पहाटे मुलाला जन्म दिला. या बाळाला विमान कंपनीने आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची भेट सोमवारी जाहीर केली.

जेटचे 9 डब्ल्यू 569 या विमानाने काल पहाटे पावणेतीनच्या सुमारास दम्माम येथून कोचीसाठी उड्डाण केले होते. या विमानातून प्रवास करणाऱ्या गर्भवतीला अचानक प्रसूतिवेदना सुरू झाल्या. विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीची वैद्यकीय निकड पाहून विमान मुंबईकडे वळविले. मात्र, विमान अरबी समुद्रावरून प्रवास करीत असतानाच संबंधित महिलेने एका बाळास जन्म दिला. या विमानातून प्रवास करणाऱ्या विल्सन नावाच्या परिचारिकाने प्रसूतीसाठी कर्मचाऱ्यांना मदत केली.

विमान प्रवासात प्रसूती होण्याची घटना कंपनीच्या इतिहासात प्रथमच घडली असल्याने "जेट एअरवेज'ने नवजात बाळास कंपनीच्या विमानातून आयुष्यभर मोफत प्रवास करण्यासाठी पास भेट म्हणून दिला. ही माहिती कंपनीने प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.

मुंबईत विमान उतरताच महिला व तिच्या नवजात बाळास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.