गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा करा: मोहन भागवत

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

गोसंरक्षणाचे कार्य हे कायद्याच्या कक्षेत यावे. या कायद्याचे कटेकोररित्या पालन व्हावे. गोहत्येच्या नावाखाली करण्यात येणारा हिंसाचार हा मूळ हेतुची कुप्रसिद्धी करणारा आहे

नवी दिल्ली - गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा, अशी मागणी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) गोसंरक्षणाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे मूळ हेतुचीच कुप्रसिद्धी होत असल्याचे मत व्यक्त केले.

"गोहत्येविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक कायदा असावा. गोसंरक्षणाचे कार्य हे कायद्याच्या कक्षेत यावे. या कायद्याचे कटेकोररित्या पालन व्हावे. गोहत्येच्या नावाखाली करण्यात येणारा हिंसाचार हा मूळ हेतुची कुप्रसिद्धी करणारा आहे,'' असे भागवत म्हणाले.

राजस्थानमधील पेहलु खान या 55 वर्षीय शेतकऱ्यास गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर सरसंघचालकांचे हे विधान अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. जयपूर येथून गायींची खरेदी करुन परतत असलेल्या खान व त्यांच्या सहकाऱ्यांना गोरक्षकांनी पाठलाग करुन मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद संसदेमध्येही उमटले होते. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली होती.