विनयभंग प्रकरणातील आरोपी "डिलिव्हरी बॉय'

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

चारही आरोपींना 48 तासांत अटक केली. या घटनेत संबंधित युवती तक्रार देण्यासाठी पुढे येईल किंवा तिचा जबाब घेण्यासाठी आम्ही वाट पाहिली नाही. कारण सीसीटीव्हीतील चित्रीकरण हा या गुन्ह्याचा बळकट पुरावा आहे

 

बंगळूर - बंगळूरमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री पार्टीहून घरी परतणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले चार युवक "डिलिव्हरी बॉय'म्हणून काम करीत असून, पोलिसांनी त्यांची नावे शुक्रवारी जाहीर केली. कम्मनहळ्ळी या परिसरात राहणाऱ्या या युवकांची नावे नितीश कुमार ऊर्फ अय्यप्पा (वय 19), लेनिन पॅट्रिक ऊर्फ लिनो (वय 20), सुदेश ऊर्फ सुदी (वय 20), सोमशेखर ऊर्फ चिन्नी (वय 24) अशी आहेत. आरोपींना शोधून काढण्यासाठी कम्मनहळ्ळी येथील रहिवासी प्रशांत फ्रान्सिस यांनी मदत केल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण सूद यांनी सांगितले.

""त्यांच्या निवासस्थानी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रण झाले आहे. फ्रान्सिस यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर आम्ही वेळ न दवडता गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले. त्यांनी चारही आरोपींना 48 तासांत अटक केली. या घटनेत संबंधित युवती तक्रार देण्यासाठी पुढे येईल किंवा तिचा जबाब घेण्यासाठी आम्ही वाट पाहिली नाही. कारण सीसीटीव्हीतील चित्रीकरण हा या गुन्ह्याचा बळकट पुरावा आहे,'' असे ते म्हणाले.

मूळची ईशान्य भागातील असलेली ही युवती शिक्षणासाठी बंगळूरमध्ये काही महिन्यांपूर्वी आली होती. विनयभंगाचा हा प्रकार अचानक घडलेला नसून, तो पूर्वनियोजित होता. पीडित युवतीची मैत्रीण एका आरोपीच्या घराजवळ राहते. तिच्या घरी युवतीचे कायम येणे-जाणे होते. गेल्या आठवड्यात ती मैत्रीणीच्या घरीच राहायला आली होती. त्याच वेळी आरोपींचे तिच्याकडे लक्ष गेले असावे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (ता. 5) अटक केली. त्यांना मंगळवारपर्यंत (ता. 10) न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.