आकस्मित घटनांना सामोरे जाण्यास समर्थ : धनोआ

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

बंगळूर : भारतीय हवाईदल कोणत्याही आकस्मित घटनांना सामोरे जाण्यास समर्थ आहे, असे प्रतिपादन हवाई दलप्रमुख बिरेंदर सिंग धनोआ यांनी आज येथे केले. भूतानमधील डोकलाम येथे भारत आणि चीन यांचे सैन्य समोरासमोर उभे राहिल्याच्या पार्श्‍वभूमीवर हवाई दलाच्या तयारीबाबत विचारता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीनतर्फे आयोजित 56 व्या वार्षिक परिषदेच्या उद्‌घाटनासाठी हवाईदल प्रमुख धनोआ येथे आले होते. धनोआ यांनी जुलैत प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, 1999 च्या कारगिल युद्धानंतर गेल्या 18 वर्षांत हवाईदलाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवस आणि रात्र आणि सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्याची क्षमता आता हवाईदलामध्ये आली आहे. सीमा भागात दक्षता ठेवण्याच्या क्षमतेतही वाढ झाली आहे. ते म्हणाले की, आपण अगदी थोड्या कालावधीतही आणि जे आपल्याकडे उपलब्ध नाही अशा परिस्थितीतही काम करण्यास समर्थ असले पाहिजे.

तत्पूर्वी आपल्या भाषणात धनोआ म्हणाले की, पूर्वी वैद्यकीय कारणास्तव पायलट्‌सना विमान चालविण्यास बंदी करण्यात येत होती, त्यामुळे हवाई दलाचे मोठे नुकसान होत होते. आपले वैज्ञानिक काम या पायलट्‌साठी आशादायक असून आपण या आजारांवर नियंत्रण मिळवू शकलो आहोत, त्यामुळे पायलट्‌स आपल्या कामावर पूर्ण क्षमतेने पुन्हा परतु शकतील.