मोदी उत्तम अभिनेतेः प्रकाश राज

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

प्रकाश राज यांनी कॉंग्रेसवर टीका करायला हवी. कारण, सध्या कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. पोलिसांना अद्यापपर्यंत मारेकऱ्यांना का शोधता आलेले नाही.
- नलिन कोहली, भाजप प्रवक्‍त्या

बंगळूर: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन धारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज आघाडीचे अभिनेते प्रकाश राज यांनी सडकून टीका केली. मोदी हे आपल्यापेक्षाही सर्वोत्तम अभिनेते असून, मला मिळालेले पुरस्कार हे खऱ्या अर्थाने मोदींना मिळायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. सभोवतालचे वातावरण पाहून मला मिळालेले राष्ट्रीय सन्मान आता परत करावेसे वाटतात, अशी भावनाही त्यांनी या वेळी बोलून दाखविली. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) 11 व्या राज्य अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काही मंडळी सोशल मीडियामध्ये विष ओकत होती, अशा मंडळींना पंतप्रधान मोदी हे ट्विटरवर फॉलो करतात. माझी मैत्रीण असणाऱ्या गौरी लंकेश यांना कोणी मारले, हे मला माहिती नाही; पण त्यांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना मी स्पष्टपणे पाहू शकतो, असे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. योगींची वक्तव्ये पाहिली तर ते मुख्यमंत्री आहेत की धर्मगुरू हेच समजत नाही. माझ्यापेक्षा ते उत्तम अभिनेते असून, मी मला मिळालेले पुरस्कार त्यांना द्यायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले.